IND vs NZ : टीम इंडिया धर्मसंकटात, विराट कोहलीसाठी कोणता फलंदाज बलिदान देणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. याद्वारे विराट कोहली संघात पुनरागमन करेल. कानपूरच्या पहिल्या कसोटीत त्याने विश्रांती घेतली होती.
1 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांचे लक्ष आता पुढच्या कसोटीकडे लागले आहे. दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. याद्वारे विराट कोहली संघात पुनरागमन करेल. कानपूरच्या पहिल्या कसोटीत त्याने विश्रांती घेतली होती. पण दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासमोर प्रश्न असा आहे की, विराट कोहलीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यासाठी संघातील कोणत्या खेळाडूला बाहेर बसवलं जाणार? चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोन वरिष्ठ खेळाडू फॉर्मशी झगडत आहेत, अशात विराट कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे विराटच्या जागेची गुंतागुंत वाढली आहे. तसेच, भारतीय संघ पाचपैकी एकाही गोलंदाजाला वगळू शकत नाही. अशा परिस्थितीत मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यापैकी एकाला बाहेर जावे लागेल.
2 / 5
सध्या तरी अजिंक्य रहाणेवरच टांगती तलवार आहे. कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांत तो अपयशी ठरला आणि एक अर्धशतकदेखील ठोकू शकला नाही. यासोबतच 2021 मध्येही त्याची खराब कामगिरी कायम आहे. रहाणेची यंदा 12 कसोटीत धावांची सरासरी केवळ 19.57 आहे. मायदेशात त्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. मायदेशात किमान 32 कसोटी सामने खेळलेल्या भारतीय फलंदाजांपैकी फक्त मन्सूर अली खान पतौडी आणि मोहिंदर अमरनाथ रहाणेच्या मागे आहेत. रहाणेची भारतीय खेळपट्ट्यांवर सरासरी 35.73 आहे. 2018 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती, तेव्हा रहाणेला खराब कामगिरीमुळे संघातून वगळण्यात आले होते. त्याची पुनरावृत्ती मुंबई कसोटीत पाहायला मिळू शकते.
3 / 5
चेतेश्वर पुजाराची स्थिती काही वेगळी नाही. यावर्षी त्याची सरासरी धावसंख्या 30.42 आहे, तर 2020 मध्ये ती 20.37 होती. त्याला कसोटी शतक झळकावून बराच काळ लोटला आहे. मात्र, घरच्या खेळपट्ट्यांवर चेतेश्वर पुजाराची सरासरी 55.33 आहे. अशा परिस्थितीत त्याची जागा वाचू शकते. पुजाराला सलामीला उतरवण्याचा निर्णयदेखील संघ व्यवस्थापन घेऊ शकतं. पुजाराने यापूर्वीही हे केले आहे. सलामीवीर म्हणून सहा डावात त्याने 116 च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि केवळ तीन वेळा तो बाद झाला आहे.
4 / 5
मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनाही संघातून वगळले जाऊ शकते. सलामीवीर म्हणून दोघेही पहिली पसंती नाहीत. रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीमुळे दोघेही संघात सलामीवीर म्हणून खेळत आहेत. मयंक जानेवारी 2021 नंतर प्रथमच कसोटी खेळला पण मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्याचवेळी शुभमन गिलने कसोटी चॅम्पियनशिप फायनलनंतर पहिली कसोटी खेळली. त्याने पहिल्या डावात अर्धशतक ठोकले. पण दुसऱ्या डावात त्याला स्वस्तात माघारी परतावे लागले. संघ व्यवस्थापनाने पुजारासह ओपनिंग करण्याचा निर्णय घेतल्यास मयंक आणि गिल या दोघांपैकी एकाला बाहेर जावे लागेल.
5 / 5
श्रेयस अय्यरने कारकिर्दीतील पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. अशा परिस्थितीत त्या संघाबाहेर बसवलं जाण्याची शक्यता कमी आहे. पण 2016 मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारतात आला तेव्हा करुण नायरने चेन्नईत त्रिशतक झळकावले होते पण त्याला पुढच्या कसोटीतून बाहेर जावे लागले होते. अशा स्थितीत अय्यरलादेखील बाहेर जावे लागू शकते. असे झाल्यास युवा फलंदाजावर अन्याय होईल.