कानपूर : टी-20 मालिकेत भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 3 टी-20 सामन्याची मालिका सहज जिंकली. आता अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार आहे. या दोघांवर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपसह कसोटीत नंबर वन होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची जबाबदारी असेल. कानपूर कसोटी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळली जाईल, तर मुंबई कसोटीत संघ विराटच्या नेतृत्वात खेळेल. भारताने या दोन्ही कसोटी जिंकल्या तर कसोटीतील नंबर वन संघ बनण्याच्या दिशेने वाटचाल ठरु शकते. (IND vs NZ: Team India eye on Test series against New Zealand, Opportunity to top ICC rankings)
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 25 नोव्हेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने ज्या प्रकारे टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला, त्यानंतर टीम इंडियाला कसोटी मालिका 2-0 ने जिंकण्याची संधी आहे. 2-0 असा विजय भारताला पुन्हा एकदा ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1 होण्याच्या ध्येयाच्या जवळ नेऊ शकतो.
टीम इंडिया सध्या 119 गुणांसह कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडचे 126 गुण आहेत. आयसीसी क्रमवारीत संघाचे स्थान हे रेटिंग ठरवते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता न्यूझीलंड सध्या 126 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जर टीम इंडियाने जिंकला तर टीम इंडियाच्या क्रमवारीत सुधारणा होईल, पण जर टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले तर भारतीय संघाला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी मिळेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि मयंक अग्रवाल आणि इतर काही खेळाडू गेल्या 7 दिवसांपासून मुंबईतील शिबिरात मेहनत घेत होते. संपूर्ण भारतीय संघ आता कानपूरला गेला आहे. कोलकात्यातील टी-20 मालिका संपल्यानंतरही त्यात खेळणाऱ्या कसोटी संघाचे 5 खेळाडूही कानपूरला गेले आहेत. रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघाचा भाग नसेल. या मालिकेतून त्याने विश्रांती घेतली आहे. रोहितने कोलकाता ते मुंबई फ्लाइट पकडली आहे.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.
न्यूझीलंडचा कसोटी संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, नील वॅगनर
इतर बातम्या
IND VS NZ: रोहित शर्माची हॅट्ट्रिक, विराट कोहली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
रोहितचं अर्धशतक, हर्षल-अक्सरची उत्कृष्ट गोलंदाजी, भारताची न्यूझीलंडवर 73 धावांनी मात, मालिकेवर कब्जा