मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतील भारताच अभियान आजपासून सुरु होत आहे. भारताचा पहिलाच सामना परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता मॅच सुरु होईल. या सामन्याआधी दोन्ही देशातील क्रिकेट एक्सपर्ट वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत. सामना कोण जिंकणार? याबद्दल भविष्यवाणी करतायत. भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल (Bhuneshwar Kumar) भाष्य केलं आहे. स्विंग गोलंदाजी ही भुवनेश्वर कुमारची ताकत आहे. सुरुवातीच्या षटकात आपल्या स्विंग चेंडूंनी प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट काढणं हे भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीच वैशिष्टय आहे. इंग्लंड दौऱ्यात टी 20 मालिकेत भुवनेश्वरने आपल्या स्विंग चेंडूंची ताकत दाखवून दिली होती.
संयुक्त अरब अमिरातीमध्येही त्याच्याकडून अशा स्विंग गोलंदाजीची अपेक्षा आहे. पण हरभजन सिंग यांच्यामते, UAE मध्ये भुवनेश्वरकुमारला स्विंग मिळणार नाही. त्याचे चेंडू स्विंग होणार नाहीत. त्यामुळे भुवनेश्वरकुमारला दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.
दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलटचा आशिया कपसाठी निवडलेल्या संघात समावेश केलेला नाही. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर आहे. त्याच्याजोडीला आवेश खान आणि अर्शदीप सिंह आहेत. एनसीए मध्ये बुमराह आणि हर्षलचं रिहॅब सुरु आहे. वयोमानामुळे मोहम्मद शमीचा टी 20 संघात विचार होत नाही.
“जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांशिवाय भारतीय संघ खेळतोय. हे विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात नसण्यासारखं आहे” असं हरभन स्पोर्ट्स टुडेवर म्हणाला. भारताची फिरकी गोलंदाजी बळकट आहे. रवीचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल या टीम मध्ये आहेत.
“जेव्हा चेंडू स्विंग होत नाही, तेव्हा गोलंदाजाने चेंडूची दिशा आणि टप्पा अचूक ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा परिस्थिती अनुकूल नसेल, तेव्हा तुम्ही तुमच्या खेळात बदल करणं आवश्यक आहे. भुवनेश्वर कुमार दोन्ही दिशेला चेंडू स्विंग करु शकतो. पण यूएई मधल्या वातावरणात चेंडूला स्विंग मिळणार नाही” असं हरभजन सिंग म्हणाला.
“योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही फलंदाजाला मोकळीक देणं परवडणारं नाही. तुम्हाला स्विंग मिळाला, तर चांगलचं आहे. पण चेंडू स्विंग होत नसेल, तर अशा स्थितीत अचूक टप्पा आणि दिशा ठेवावी लागेल” असं हरभजनने सांगितलं.