मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली आहे. आज संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेला महामुकाबला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये रंगणार आहे. आज हा सामना सुरु होण्याआधी टीम इंडियाला एक चांगली बातमी मिळाली आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड कोरोना व्हायरस (Rahul Dravid Corona Virus) मधून बरे झाले आहेत. राहुल द्रविड यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ते दुबई मध्ये दाखल झाले आहेत. चार दिवसांपूर्वी राहुल द्रविड यांचा कोरोना व्हायरस चाचणीचा रिपोर्ट् पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे टीम इंडिया सोबत ते दुबईला जाऊ शकले नव्हते. राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत बीसीसीआयने व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्यावर हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली होती.
इंग्रजी वर्तमानपत्र इंडियन एक्सप्रेसने शनिवारी एका बीसीसीआय सूत्राच्या हवाल्याने कोच राहुल द्रविड यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं वृत्त दिलं. राहुल द्रविड एकदम फिट असून ते यूएईमध्ये दाखल झाले आहेत. आज टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध सामना आहे. क्रिकेट विश्वातील या महामुकाबल्याकडे सगळयांचेच लक्ष लागले आहे. राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी संघाला मार्गदर्शन केलं.
टीम इंडिया दुबईला रवाना होणार त्याच्या एकदिवस आधी 21 ऑगस्टला राहुल द्रविड यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट् पॉझिटिव्ह आला होता. बंगळुरुतील आपल्या निवासस्थानी ते आयसोलेशन मध्ये होते. त्यानंतर बीसीसीआयने केलेल्या दुसऱ्याचाचणीत त्यांचा RT-PCR टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. शनिवारी रात्रीच बीसीसीआयने त्यांची दुबईला जाण्याची व्यवस्था केली.
राहुल द्रविड मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय टीमचे हेड कोच बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमची ही पहिली मोठी परीक्षा आहे. टीम इंडियाने अलीकडेच वनडे आणि टी 20 सीरीज मध्ये दमदार प्रदर्शन केलं आहे. खासकरुन टी 20 क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. फलंदाजांनी आपलं कौशल्य दाखवताना क्षमतेनुसार खेळ केला आहे. आता आशिया कप मध्ये पहिली परीक्षा आहे.