मुंबई: टीम इंडिया आज पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध खेळणार आहे. आशिया कप (Asia cup) स्पर्धेतील या महामुकाबल्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलय. पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मा कोणाला संधी देणार? प्लेइंग 11 कशी असेल? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. टीम निवडताना, रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघांपैकी प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी द्यायची? हा मुख्य प्रश्न असणार आहे. दोघेही विकेटकीपर फलंदाज असून दोघांकडेही एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. दिनेश कार्तिकला फिनिशरच्या रोलसाठी संघात घेतलं आहे. दिनेश प्रमाणे ऋषभ पंतने सुद्धा आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं आहे. शनिवार संध्याकाळपर्यंत रोहित शर्मा दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांपैकी कोणाला निवडायच? याबद्दल काही ठरवू शकला नव्हता. ऋषभ पंतच्या रुपाने डावखुऱ्या फलंदाजांचा पर्याय मिळतो, तर दिनेश कार्तिक हाणामारीच्या षटकांमध्ये स्पेशलिस्ट आहे.
पहिले चार फलंदाज आणि ऑलराऊंडर्स जवळपास निश्चित आहेत. त्यांच्या निवडीमध्ये कुठली समस्या नाहीय. पण विकेटकीपरचा विषय येतो, तिथे रोहितला विचार करावा लागणार. रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघे सलामीला येणार. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या नंबरवर सूर्यकुमार यादव आहे. ऑलराऊंडर्स मध्ये हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजा यांची निवड निश्चित मानली जात आहे. फक्त विकेटकीपरची निवड करताना बराच विचार करावा लागेल.
“प्लेइंग 11 बद्दल अजून आम्ही निर्णय घेतलेला नाही. आज श्रीलंका-अफगाणिस्तान सामना होतोय, त्याच पीचवर सामना होणार आहे. ही मॅच कशी होते, काय निकाल येतो, त्यावर आम्ही आमची प्लेइंग इलेव्हन ठरवू. मी क्युरेटर सोबत बोललोय. टॉस इथे फॅक्टर ठरणार नाही. खेळपट्टीवर फार दव पडणार नाही. आज श्रीलंका-पाकिस्तान सामना कसा होतो ते पाहू, त्यानुसार निर्णय घेऊ” असं रोहित शर्मा शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाला.
The #AsiaCup2022 is a fresh tournament and a new start. We are here for a purpose and we will focus on what we want to achieve from this tournament. Everyone is very excited to be here: #TeamIndia captain @ImRo45 ahead of #INDvPAK. pic.twitter.com/HxfO5ziSJ5
— BCCI (@BCCI) August 27, 2022
वनडे, टेस्ट आणि आता टी 20 सर्व फॉर्मेट मध्ये विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला पहिली पसंती आहे. पण टी 20 मध्ये ऋषभ थोडा संघर्ष करताना दिसतो. आयपीएल 2022 पासून दिनेश कार्तिक भन्नाट फॉर्म मध्ये आहे. वयाच्या 36 व्या वर्षी दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजीने निवड समितीला दखल घ्यायला भाग पाडलं. हाणामारीच्या षटकात दिनेश कार्तिकचा रोल महत्त्वाचा आहे. कारण मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळेच आगामी टी 20 वर्ल्ड कपचा विचार करुन दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आलय. जर त्याला संधी दिली नाही, तर त्याला संघात निवडण्याचा उपयोग होणार नाही.