मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. त्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडी समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंची आणि संघाची तुलना करत आहेत. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आतापर्यंत कधीही भारताला पराभूत करु शकलेला नाही. याचदरम्यान, या सामन्याबद्दल एक भविष्यवाणी करण्यात आली आहे. (IND vs PAK : I am hoping that 5-0 record in T20 World Cup will become 5-1 : Younis Khan)
पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानला आशा आहे की, आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या महामुकाबल्यात पाकिस्तान भारताला हरवून 5-1 असा नवा विक्रम प्रस्थापित करेल. तो म्हणाला की, भारत-पाकिस्तान सामन्यात खूप दडपण असते आणि जो खेळाडू हे दडपण सहन करू शकतो तो दिग्गज बनतो. उभय संघांमध्ये उद्या दुबईत टी-20 सामना खेळवला जाणार आहे.
युनूस खान म्हणाला की, पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून मला आशा आहे की, या टी -20 विश्वचषकात 5-0 चा विक्रम 5-1 असा होईल. हा अतिशय दडपणाचा सामना असेल. जे खेळाडू हे दडपण सहन करतील त्यांना महान खेळाडू म्हटले जाईल. 2009 च्या टी-20 विश्वचषक ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवणाऱ्या युनूसचे मत आहे की, एमएस धोनीला ड्रेसिंग रूममध्ये मेंटॉर म्हणून ठेवणे हा या मेगा इव्हेंटमध्ये भारतासाठी एक मोठा प्लस पॉईंट आहे, कारण धोनी मोठ्या दबावाच्या सामन्यात खेळू शकतो. मार्गदर्शक म्हणून मोठी भूमिका तो निभावणार आहे. त्याच्यात वातावरण शांत ठेवण्याची आणि अति दडपण असलेला सामना जिंकण्याची क्षमता आहे, ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघ स्वतःच कोसळू शकतो.
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना करणाऱ्यांना एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे. पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा खेळाडू मोहम्मद अमीर याने बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना होऊ शकत नाही असं म्हटलं आहे, अमीर म्हणाला की, “ती व्यक्ती मूर्ख असेल जी शाहीन आफ्रिदीची तुलना जसप्रीत बुमराहशी करेल. बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी अजून बच्चा आहे.”
मोहम्मद आमीर म्हणाला, “शाहीन आफ्रिदीची सध्या बुमराहशी बरोबरी करणे मूर्खपणाचे ठरेल. कारण, शाहीन अजून यंग आहे आणि शिकत आहे. दुसरीकडे, बुमराह बराच काळ टीम इंडियाकडून खेळत आहे. माझ्या मते, तो सध्या टी-20 मध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये बुमराहचा सामना करणे अवघड आहे. पण शाहीन सध्या पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे.” आमिर म्हणाला, “तरीही दोघांमध्ये चांगली लढत होईल. कारण बुमराह नवीन चेंडूने चांगली कामगिरी करतो आणि शाहीन सध्या नवीन चेंडूसह सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.”
इतर बातम्या
T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी
T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री
(IND vs PAK : I am hoping that 5-0 record in T20 World Cup will become 5-1 : Younis Khan)