नवी दिल्ली: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज मध्ये खेळतोय. त्यानंतर झिम्बाब्वेचा दौरा आहे. पाकिस्तानची टीम नेदरलँडस विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर आशिया कप स्पर्धा सुरु होईल. त्यात कट्टर परंपरागत प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने-सामने येतील. आशिया कप मध्ये फक्त एकदाच नाही, तर 3 वेळा दोन्ही टीम्स आमने-सामने येऊ शकतात. रोमांच डबल नाही, ट्रिपल होऊ शकतो. भारत-पाकिस्तान सामना नेहमीच क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी समान असतो. चढ-उतारांनी भरलेल्या या लढतीत अनेकदा श्वास रोखला जातो. कारण दोन्ही बाजूंच्या क्रिकेट चाहत्यांना पराभव अजिबात मान्य नसतो. आता आशिया कप मध्येही क्रिकेट रसिकांना अशीच मेजवानी मिळू शकते. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? भारत-पाकिस्तान मध्ये एक सामना निश्चित आहे. पण आशिया कप मध्ये दोन्ही टीम्स मध्ये 3 वेळा सामना कसा होऊ शकतो? त्यासाठी ही गोष्ट समजून घ्या.
आशिया कप स्पर्धेची सुरुवात 27 ऑगस्टपासून होतेय. 11 सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्याने स्पर्धेची सरुवात होईल. 28 ऑगस्टला दुसरा हायवोल्टेज सामना भारत-पाकिस्तानचा आहे.
भारत आणि पाकिस्तानचे संघ 4 सप्टेंबरला सुपर फोर राऊंड मध्ये भिडू शकतात. भारत आणि पाकिस्तानचा संघ ए ग्रुप मध्ये आहे. हे दोन्ही संघ त्या ग्रुप मध्ये टॉप टू वर राहिले, तर 4 सप्टेंबरला पुन्हा त्यांच्यात लढत होईल. ग्रुप मध्ये भारत-पाकिस्तानचे संघ टॉप टू मध्ये रहाण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान मध्ये तुम्ही तिसऱ्या लढतीचा विचार करत असाल, तर हा सामना 11 सप्टेंबरला फायनल मध्ये होऊ शकतो. सुपर फोर राऊंड मध्ये दमदार प्रदर्शन करुन हे संघ फायनल पर्यंत पोहोचू शकतात. आशियाई टीम्स मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन मजबूत संघ आहेत. अलीकडे टी 20 फॉर्मेट मध्ये दोन्ही संघाचं प्रदर्शनही कमालीच राहिलं आहे. हे दोन्ही संघ फायनल मध्ये पोहोचले, तर आश्चर्य वाटणार नाही.
विशेष म्हणजे हे तिन्ही सामने एकाच मैदानावर खेळले जाणार आहेत. तिन्ही सामन्यांच आयोजन दुबईत होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता सामने सुरु होतील.