मुंबई: अपेक्षेप्रमाणे भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना रोमांचक झाला. भारताने शेवटच्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केलं. अटीतटीचा हा सामना चढ-उतारांनी भरलेला होता. या विजयासह भारताने आशिया कप (Asia cup) स्पर्धेचा शानदार शुभारंभ केला आहे. दहा महिन्यानंतर भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले होते. या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमाल दाखवली. खासकरुन भारतीय गोलंदाजांनी (Indian Bowlers) पाकिस्तानी फलंदाजांना बांधून ठेवलं. त्याने फटके खेळण्याची मोकळीक दिली नाही. भारताने पाकिस्तानचा डाव 147 धावात गुंडाळला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शॉर्ट चेंडूंचा वापर केला. भारताच्या या रणनितीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलय.
भारताने या सामन्यात पहिली गोलंदाजी केली. तिथेच भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह आणि आवेश खान या भारताच्या तेज गोलंदाजांनी पाकिस्तानला अजिबात संधी दिली नाही. दहा महिन्यापूर्वी दुबईच्या याच मैदानात भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानचा एकही विकेट काढता आला नव्हता. पण यावेळी 10 विकेट काढल्या. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व विकेट वेगवान गोलंदाजांनी काढले.
भारतीय गोलंदाजांच्या यशाचं मोठ श्रेय शॉर्ट पीच चेंडूंना जातं. भुवनेश्वर कुमार सुरुवातीच्या षटकात स्विंग चेंडूचा खूप सुंदररित्या वापर करतो. पण इथे भुवनेश्वरने गुड लेंथ आणि शॉर्ट चेंडू सुरुवातीला टाकले. तिसऱ्या ओव्हर मध्ये अशाच शॉर्ट पीच चेंडूवर बाबर आजमला चुकीचा फटका खेळायला भाग पाडलं व विकेट मिळवला. आवेश खानला पहिल्या दोन चेंडूंवर चौकार बसला. पण त्यानंतर वेगवान चेंडूवर फखर जमांने अपर कट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी झाला नाही. यष्टीपाठी त्याला झेल घेतला.
हार्दिक पंड्याने शॉर्ट चेंडूंचा चांगला वापर केला. हार्दिक पंड्या फिट होऊन मैदानात परतला आहे. त्याचा परिणाम त्याच्या उत्तम गोलंदाजीमध्ये दिसतोय. हार्दिकने वेगवान चेंडूंसह बाऊन्सर आणि शॉर्ट चेंडूंचा वापर केला. त्यामुळे धावांना लगाम बसला. त्याने तीन विकेट घेतले. इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान आणि खुशदिल शाहची विकेट त्याने काढली.