मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. जाहिरातीच्या माध्यमातून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. चाहतेही सोशल मीडियावर एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. 7 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे पुन्हा एकदा भारताला ‘मौका’ असल्याची चर्चा आहे. पण क्रिकेट हा एक खेळ आहे. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. पण यामुळे खेळाडूंवर दबाव येतो यात शंका नाही. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीर याने काही खास टीप्स दिल्या आहेत. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दबाव कसा दूर करायचा, याबाबत तोडगा सांगितलं आहे.
गौतम गंभीर याने सांगितलं की, ‘दोघांचा फॉर्म चांगला आहे. त्यांनी फक्त क्रिकेटवर फोकस करावं. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावं.’ गौतम गंभीर याने सल्ला देताना सांगितलं की, “रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर तितका दबाव नसेल. पण इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर दबाव असेल.”
“दबाव असणं यात काही मोठं नाही. कारण एक लाख लोकांसमोर खेळणार. तुम्ही जिथे जाल तिथे सांगितलं जाईल की हा सामना हारू नका. त्यामुळे खेळाडूंवर दबाव असेलच. पण खेळाडूंनी क्रिकेटवर फोकस करावं . तसेच या गोष्टींपासून दूर राहावं. सर्वांचा फॉर्म चांगला आहे. त्यामुळे स्पर्धेकडे बघा आणि सामन्याकडे नको. लोकं काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. आजपासून सामना होईपर्यंत ईयर पॉड लावून फिरा. बाहेरच्या लोकांचं ऐकणं जितकं टाळात तितकं बरं होईल.”, असं गौतम गंभीर म्हणाला.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इशान आणि श्रेयसची सुरुवात एकदम खराब झाली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दोघंही शून्यावर बाद झाले होते. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इशान किशनने कमबॅक केलं आणि 47 चेंडूत 47 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. श्रेयस अय्यरने 23 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. यात एक उत्तुंग षटकार देखील मारला.