मुंबई: पुढच्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होत आहे. क्रिकेटप्रेमींना या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या लढतीची उत्सुक्ता आहे. दोन्ही टीम्सची ही पहिली मॅच असणार आहे. मागच्यावर्षी सुद्धा वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्समध्ये मॅच झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने बाजी मारली होती.
मॅचची वातावरण निर्मिती सुरु
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दोन्ही देशांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यासाठी अजून काही दिवस बाकी आहेत. पण पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने आतापासूनच मॅचची वातावरण निर्मिती सुरु केलीय. टीम इंडियाला त्याने इशारा दिलाय.
सध्या पाकिस्तानी टीम इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरीज खेळतेय. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ या टीममध्ये आहे. त्यानेच भारताविरुद्धच्या सामन्याआधी वक्तव्य केलय.
मेलबर्नवर होणार मॅच
भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याची मी तयारी सुरु केलीय. माझ्या गोलंदाजीचा सामना करणं टीम इंडियासाठी सोपं नसेल, असं त्याने म्हटलय. मेलबर्नमध्ये हा सामना खेळला जाणार असल्याने रौफ जास्त उत्साहात आहे.
मेलबर्न त्याच्यासाठी घरच्या मैदानासारख
हॅरिस रौफच्या मते मेलबर्न त्याच्यासाठी घरच्या मैदानासारख आहे. रौफ ऑस्ट्रेलियात होणारी बिग बॅश लीग स्पर्धा खेळलाय. तो मेलबर्न स्टार्स संघाचा भाग होता. बिग बॅश लीगमधील चांगल्या कामगिरीमुळेच त्याला पाकिस्तानी टीममध्ये संधी मिळालीय.
“जर मी माझं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं, तर त्यांच्यासाठी माझी गोलंदाजी खेळणं सोपं नसेल. मी खूप खुष आहे, कारण मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ही मॅच होतेय” असं हॅरिस रौफ म्हणाला.
तिथे कसं खेळायचं हे मला माहितीय
हॅरिस रौफने आतापासूनच टीम इंडिया विरोधात गोलंदाजीच्या रणनितीवर काम सुरु केलय. “हे माझ्यासाठी घरचं मैदान आहे. कारण मी इथे मेलबर्न स्टार्ससाठी खेळलोय. तिथे कसं खेळायचं हे मला माहितीय. भारताविरोधात कशी गोलंदाजी करायची, त्याची मी रणनिती बनवायला सुरुवात केली आहे” असं हॅरिस रौफ म्हणाला.