मुंबई: क्रिकेट मध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. आशिया कप स्पर्धेत काल भारत-पाकिस्तान मध्ये दुसरा सामना झाला. त्यावेळी हाच फरक दिसून आला. या सामन्यात पाकिस्तानने अवघड झेल सोडले नाहीत. पण भारताकडून मोक्याच्या क्षणी अर्शदीप सिंहने सोपा झेल सोडला. सामना नाजूक वळणावर असताना अर्शदीपकडून ही चूक झाली. ज्याची किंमत संघाला चुकवावी लागली. भारताच्या पराभवासाठी फक्त त्या एका कॅचला जबाबदार धरता येणार नाही. पण हा, पराभवाचं ते एक कारण आहे, असं नक्कीच म्हणता येईल.
भारताचा पराभव झाल्यानंतर काल विराट कोहलीने पत्रकार परिषदेला संबोधित केलं. त्यावेळी विराटला अर्शदीपकडून सुटलेल्या कॅच बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विराटने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. एकप्रकारे विराटने अर्शदीपचा बचाव केला.
“अर्शदीपकडून जी चूक झाली, तशीच चूक माझ्याकडूनही झाली होती. करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही चूक मी केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना होता. त्यावेळी शाहीद आफ्रिदीच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून आऊट झालो. त्यानंतर संपूर्ण रात्री मी झोपू शकलो नाही. माझी झोप उडाली होती. माझं करीयर आता संपलं, असाच माझा समज झाला होता” असं विराटने सांगितलं.
“या अशा प्रसंगातून तुम्ही शिकता. हा असाच प्रसंग पुन्हा येऊं दे अशी तुमची इच्छा असते, कारण तुम्ही चूक सुधारलीय हे तुम्हाला दाखवून द्यायचं असतं. अर्शदीपला पुन्हा संधी मिळाल्यानंतर तो, संधी वाया जाऊ देणार नाही, अशी अपेक्षा आहे” असं विराट म्हणाला.
अर्शदीप सिंहने कॅच ड्रॉप केल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जातय. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांनी या ट्रोलिंगची निंदा करताना अर्शदीपचा बचाव केला. अर्शदीपने पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात 3.5 षटकांमध्ये 27 धावा देऊन एक विकेट घेतला.