मुंबई: चार वर्षांपूर्वी आशिया कप स्पर्धेत सुरु झालेला टीम इंडियाच्या विजयाचा सिलसिला काल थांबला. चार वर्षांपूर्वी रोहितच्या नेतृत्वाखाली एकही सामना न गमावता टीम इंडियाने विजेतेपद मिळवलं होतं. यावेळी सुद्धा भारताने पहिले दोन सामने जिंकले. पण काल टीमला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने सुपर 4 राऊंड मध्ये भारताचा पाच विकेट राखून पराभव केला. टीम इंडियाकडून काल विराट कोहलीने दमदार खेळ दाखवला. पण शेवटच्या षटकातील त्याचा एक प्रयत्न टीमवर भारी पडला? त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय.
रविवारी 4 सप्टेंबरला दुबईच्या मैदानात भारत-पाकिस्तान सामना झाला. निर्धारीत 20 ओव्हर्स मध्ये टीम इंडियाने 7 विकेट गमावून 181 धावा केल्या. रोहित शर्मा-केएल राहुल या सलामीवीरांच्या जोडीने धमाकेदार सुरुवात दिली. त्यानंतर विराट कोहलीने सूत्र हाती घेतली. सहाव्या ओव्हर मध्ये विराट फलंदाजीसाठी आला. तो शेवटच्या षटकापर्यंत मैदानात होता. त्याने 44 चेंडूत 60 धावा फटकावल्या. त्यामुळे टीमची धावसंख्या 181 पर्यंत पोहोचली.
विराट कोहलीला दुसऱ्याबाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. प्रमुख फलंदाज पॅव्हेलियन मध्ये परतत होते. 20 व्या ओव्हर मध्ये बाबर आजमने हॅरिस रौफच्या हाती चेंडू सोपवला. कोहलीसोबत भुवनेश्वर कुमार क्रीजवर होता. भुवनेश्वर बऱ्यापैकी फलंदाजी करु शकतो. रौफने आपल्या गोलंदाजीच्या वेगात बदल करुन कोहलीला चांगलच सतावलं. या दरम्यान त्याने विराटला पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले.
ओव्हर मधील दुसऱ्या चेंडूवर विराटकडे सिंगल धाव घेण्याची संधी होती. पण त्याने एकेरी धाव घ्यायला नकार दिला. इथे कोहलीचं भुवनेश्वर विश्वास न दाखवणं कदाचित संघासाठी थोडं महाग पडलं. त्यामुळे संघाच्या धावसंख्येत आणखी एका रन्सची भर पडली असती. भुवनेश्वरही चौकार मारु शकला असता.
कोहलीचं सिंगल धाव न घेणं आश्चर्यकारक होतं. कारण त्याने संपूर्ण इनिंग मध्ये बाऊंड्रीपेक्षा एकेरी-दुहेरी धावा पळून रन्स बनवले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा प्रत्येक चेंडूवर धाव मिळवण्याचा प्रयत्न असतो.
कोहली चौथ्या चेंडूवरही बाऊंड्री मारु शकला नाही. नाईलाजाने त्याला दोन धावांसाठी पळावं लागलं. त्यात तो रनआऊट झाला. ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूंवर पाकिस्तानने सुमार क्षेत्ररक्षण केलं. त्यामुळे रवी बिश्नोईला 2 चौकार मिळाले. 20 षटकांच्या अखेरीस टीम इंडियाने 181 धावांच डोंगर उभा केला होता. पाकिस्तानने लास्ट ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विजय मिळवला. अशा परिस्थितीत निर्धाव चेंडू आणि अतिरिक्त रन्सही सुद्धा जय-पराजयात महत्त्वाचे ठरतात.