मुंबई: सातत्याने टीकाकारांच्या निशाण्यावर असलेल्या टीम इंडियाच्या बॉलर्सनी आज कमाल केली. आशिया कप त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनी निराश केलं होतं. पण आज टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ते अपयश धुवून काढलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 106 धावांवर रोखलं. भारताकडून प्रामुख्याने अर्शदीप सिंहने जबरदस्त गोलंदाजी केली.
कॅप्टन रोहित शर्माने आज टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. दीपक चाहर आणि अर्शदीप सिंहच्या जोडीने अगदी पहिल्या ओव्हरपासून दक्षिण आफ्रिकेच्या टीमला धक्के द्यायला सुरुवात केली.
टॉप ऑर्डरचा पालापाचोळा
दीपक चाहरने पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कॅप्टन टेंबा बावुमाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याने ओव्हरच्या लास्टच्या चेंडूवर बावुमाला बोल्ड केलं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरचा पालापाचोळा केला. त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या.
चार विकेट शुन्यावर
क्विंटन डि कॉक, रिली रुसो आणि डेविड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या प्लेयर्सची विकेट त्याने काढली. रुसो आणि मिलरला अर्शदीपने खातही उघडू दिलं नाही. 9 धावात दक्षिण आफ्रिकेच्या पाच विकेट गेल्या होत्या. त्यात चार विकेट शुन्यावर गेल्या होत्या. यावरुन टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीची कल्पना येते.
5 wickets summed up in 11 seconds. Watch it here ??
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia pic.twitter.com/jYeogZoqfD— BCCI (@BCCI) September 28, 2022
विकेट नाही पण अश्विनची टिच्चून गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज (41), वेन पार्नेल (24) आणि एडन मार्करामने (25) धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. अर्शदीपने 3, दीपक चाहरने-हर्षल पटेलने प्रत्येकी 2 आणि अक्षर पटेलने एक विकेट काढला. अश्विनला एकही विकेट मिळाला नाही. पण त्याने टिच्चून मारा केला. 4 ओव्हर्समध्ये त्याने 1 निर्धाव ओव्हर टाकताना 8 धावा दिल्या.