मुंबई: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर आज पहिला सामना झाला. टीम इंडियाने या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून सहज विजय मिळवला. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाने मागच्या काही सामन्यात झालेल्या चुका सुधारल्याच दिसून आलं. खासकरुन गोलंदाजीमध्ये.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 107 धावांच लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाने 20 चेंडू राखून आरामात हे लक्ष्य पार केलं. केएल राहुल नाबाद 51 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावांची खेळी केली.
आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने कसा विजय मिळवला. त्यामागची काय कारणं आहेत, ते समजून घेऊया.
– टीम इंडियाच्या आजच्या विजयाचं श्रेय जात गोलंदाजांना. गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेला दबावाखाली ठेवलं. त्यातून शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेची टीम बाहेर येऊ शकली नाही. अचूक टप्पा आणि स्विंगचा फायदा उचलून दक्षिण आफ्रिकन फलंदाजीच कबंरड मोडलं.
– अर्शदीप सिंहने टीमच्या दुसऱ्या आणि व्यक्तीगत पहिल्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या. क्विंटन डि कॉक, रिली रुसो आणि डेविड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या प्लेयर्सला त्याने तंबूत पाठवलं. रुसो आणि मिलरला अर्शदीपने खातही उघडू दिलं नाही. 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देऊन तीन विकेट काढल्या.
– दीपक चाहरने पहिल्या ओव्हरपासून टीम इंडियाला यश मिळवून दिलं. त्याने कॅप्टन टेंबा बावुमाला शुन्यावर बोल्ड केलं. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकरवी झेलबाद केलं. त्याने दोन्ही फलंदाजंना शुन्यावर बाद केलं.
– तीन ओव्हर्समध्येच दक्षिण आफ्रिकेची 5 बाद 9 अशी स्थिती होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची मोठी भागीदारी होणार नाही याची भारतीय गोलंदाजांनी काळजी घेतली. मार्कराम आणि पार्नेलची जोडी हर्षल पटेलने फोडली. अश्विनने विकेट काढली नाही. पण टिच्चून मारा केला. चार ओव्हर्समध्ये त्याने एक मेडन ओव्हरसह फक्त 8 धावा दिल्या.
– टीम इंडियाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. कॅप्टन रोहित शर्मा 0 आणि विराट कोहली 3 धावांवर आऊट झाला. त्यानंतर राहुल आणि सूर्यकुमारने जबाबदारी खेळ केला. त्यांनी आणखी पडझड होऊ न देताना टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. केएल राहुलला सूर गवसला ही टीमसाठी चांगली बाब आहे. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली.