पार्ल: पहिल्या वनडेमध्ये बॉलऐवजी बॅटने कमाल दाखवणाऱ्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) आज पुन्हा एकदा संघासाठी 38 चेंडूत नाबाद 40 धावांची महत्त्वाची खेळी करुन महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी केलेली नाबाद 48 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. अश्विनने (Ashwin) 24 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. अश्विन आणि शार्दुलच्या भागीदारीमुळे भारताला 50 षटकात 287 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचता आले.
मागच्या वनडेमधील चुकांची पुनरावृत्ती या सामन्यात दिसून आली. सलामीला आलेल्या शिखर धवन आणि राहुल जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. 63 धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. त्यानतंर विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. पुन्हा एकदा भारताचा डाव गडगडतो की, काय असे वाटत असतानाच ऋषभ पंतने (85) जबाबदारीने खेळ केला. लोकेश राहुल (55) सोबत त्याने शतकी भागीदारी रचली.
Innings Break!
Half-centuries from Rishabh Pant (85) & KL Rahul (55) propel #TeamIndia to a total of 287/6 on the board.
Scorecard – https://t.co/CYEfu9Eyz1 #SAvIND pic.twitter.com/oZdNd9SFQi
— BCCI (@BCCI) January 21, 2022
शिखर-राहुल त्यानंतर पंत-राहुल मैदानावर असेपर्यंत भारत मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. पण या जोड्या फुटल्यानंतर मधली फळी डळमळली. श्रेयस अय्यरला आज पुन्हा एकदा चांगली संधी होती. पण 11 धावांवर तो स्वस्तात बाद झाला. दक्षिण आफ्रिकेची फिरकी गोलंदाजी भारतीय फलंदाजांना झेपत नाहीय. धवन, विराट कोहली, पंत आणि अय्यर हे फिरकी गोलंदाजांचे बळी ठरले.