मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काल दुसरा T20 सामना झाला. टीम इंडियाने हा सामना 16 धावांनी जिंकला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 238 धावांचे लक्ष्य दिले होते. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती. दुसऱ्याच अर्शदीपच्या ओव्हरमध्ये त्यांनी दोन विकेट गमावल्या होत्या. 47 धावात तीन विकेट अशी दक्षिण आफ्रिकेची स्थिती होती.
त्यांनी तुफान बॅटिंग केली
तिथून दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 3 बाद 221 असा पल्ला गाठला. फक्त 16 धावांच्या फरकामुळे पराभव त्यांच्या पदरी पडला. एकवेळ दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकर आटपणार असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण डेविड मिलर आणि क्विंटन डि कॉकने असं होऊ दिलं नाही. त्यांनी तुफान बॅटिंग केली.
चौथ्या विकेटसाठी नाबाद 174 धावांची भागीदारी
अखेरच्या ओव्हरपर्यंत त्यांनी विजयाचा प्रयत्न केला. डेविड मिलरने 47 चेंडूत नाबाद 106 आणि सलामीवीर डि कॉकने 48 चेंडूत नाबाद 69 धावा फटकावल्या. मिलरच्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार होते. डि कॉकच्या इनिंगमध्ये 3 चौकार आणि 4 षटकार होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 174 धावांची भागीदारी केली.
दोघांमध्ये काय संवाद झाला?
दोघे चांगले खेळले पण डि कॉकचा स्ट्राइक रेट हा थोडा चिंतेचा विषय आहे. हाच दोन्ही खेळाडूंमधील मोठा फरक आहे. क्विंटन डि कॉकने सुरुवात थोडी धीमी केली होती. पण शेवटी त्याने वेग पकडला. मिलरने सामन्यानंतर हे मान्य केलं. सामना जिंकण्यासाठी 16 रन्स कमी पडले. त्यानंतर दोघांमध्ये काय संवाद झाला? ते मिलरने सांगितलं.
सुरुवातीला थोडा संघर्ष केला
“डि कॉकने सुरुवातीला थोडा संघर्ष केला. पण नंतर त्याला सूर गवसला. आम्हाला संधी निर्माण झाली होती. तो चौकार-षटकार खेचू शकतो. आम्हाला फक्त 16 धावा कमी पडल्या. सामना संपल्यानंतर डि कॉक माझ्याजवळ आला. त्याने आधी वेल्ड प्लेड म्हणून शाबासकी दिली नंतर सॉरी म्हटलं” असं मिलर सामन्यानंतर म्हणाला.