मुंबई: टीम इंडियाचा आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमधील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. टीम इंडियाने मालिकेत 2-0 विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या मॅचसाठी केएल राहुल आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि मिस्टर 360 सूर्यकुमार यादव या मॅचमध्ये खेळतील. आज मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
हवामान कसं असेल?
तिसरा शेवटचा टी 20 सामना इंदूरमध्ये होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. त्यावेळी पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सोमवारी टीम इंडिया इंदूरमध्ये दाखल झाली. त्यावेळी पावसानेच त्यांचे स्वागत केले.
हा सामना का महत्त्वाचा?
टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. पण हा तिसरा सामना सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
दोन प्लेयर्सना मिनी ब्रेक
टीम ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी विराट कोहली आणि केएल राहुलला तीन दिवसांचा मिनी ब्रेक देण्यात आलाय. दोघेही तिसऱ्या मॅचमध्ये खेळताना दिसणार नाही. विराट कोहली मुंबईला रवाना झालाय. राहुल बंगळुरुला गेलाय.
हाय स्कोरिंग मॅचेस
होळकर स्टेडियमवर ही मॅच होईल. या विकेटवर चेंडूला चांगला बाऊन्स मिळतो. या स्टेडियममध्ये बाऊंड्री छोटी आहे. याआधी या मैदानावर मोठ्या धावसंख्येच्या मॅचेस झाल्या आहेत. याच ग्राऊंडवर रोहित शर्माच्या 118 धावांसह टीम इंडियाने 260 धावांपर्यंत मजल मारलीय.
तिसऱ्या टी 20 संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, अर्शदीप सिंह/मोहम्मद सिराज