मुंबई: पहिल्या T 20 सामन्यात भारताला अपेक्षित निकाल लागला नाही. गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (IND vs SA) सात विकेटने पराभव केला. भारतीय संघ मायदेशात खेळतोय. त्यामुळे टीम इंडियाच पारड जड मानलं जात होतं. पण भारतीय खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या सामन्यात अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी घडल्या. भारतीय गोलंदाजांनी खराब बॉलिंग केली. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सोपा झेल सोडला. त्याशिवाय आणखी एक गोष्ट या सामन्यात घडली. ज्याने सगळयांच लक्ष वेधून घेतलं. शेवटच्या षटकात हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि दिनेश कार्तिकची जोडी मैदानावर होती. त्यावेळी हार्दिकने दिनेश कार्तिकला स्ट्राइक दिला नाही. हार्दिक पंड्याने या सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने 12 चेंडूत 31 धावा फटकावल्या. पण दिनेश कार्तिकला स्ट्राइक न देण्याच्या त्याच्या निर्णयाने सगळ्यांनाच हैराण करुन सोडलं.
भारताने या सामन्यात निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 211 धावांचा डोंगर उभा केला होता. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्खिया गोलंदाजी करत होता. नॉर्खियाने ओव्हरमधील पाचवा चेंडू पंड्याला यॉर्कर टाकला. पंड्याने मिडविकेटला फटका खेळला. या चेंडूवर सहज धावा घेता आली असती. दिनेश कार्तिक नॉन स्ट्राइकवर उभा होता. त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पंड्याने नकार दिला. शेवटच्या चेंडूवर हार्दिकने 2 धावा काढल्या.
हार्दिकच्या या कृतीवर गुजरात टायटन्सचे कोच आशिष नेहरा यांनी भाष्य केलं आहे. अलीकडेच दोघांनी मिळून आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं होतं. क्रीकबजशी बोलताना नेहरा गमतीने म्हणाला की, “पंड्याला शेवटच्या चेंडूआधी ती धाव घ्यायला पाहिजे होती. समोरच्या एन्डवर कार्तिक होता, मी नाही”
— RohitKohliDhoni (@RohitKohliDhoni) June 9, 2022
आशिष नेहराने हार्दिक पंड्याच कौतुक केलं. तो प्रत्येक रोल निभावू शकतो, असं नेहरा म्हणाले. “पंड्या असा खेळाडू आहे, जो प्रत्येक रोल निभावू शकतो. त्याच्याकडे फलंदाजीची कला आहे. आपण त्याला टेस्ट आणि वनडे चांगला खेळ दाखवताना पाहिलं आहे. तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो” असं नेहरा म्हणाला.