मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असताना, दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंता वाढतच चालली आहे. दुखापतग्रस्तांची संख्या वाढत आहे. दीपक चाहर नंतर आता या यादीत हर्षल पटेलचा (Harshal Patel) समावेश झाला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हर्षल पटेलच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे RCB च्या या गोलंदाजाला फक्त एकच ओव्हर टाकता आली. “आम्ही आरसीबीच्या मेडीकल टीमच्या संपर्कात आहोत. एक-दोन दिवसात आम्हाला हर्षलच्या दुखापतीबद्दल अपडेट हवी आहे. त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. काही दिवस अजून बाकी आहेत. त्याच्या रिकव्हरीवर सर्व काही अवलंबून आहे. आम्ही निर्णय घेऊ” असं निवड समितीच्या सदस्याने इनसाइडस्पोर्टला सांगितलं. हर्षल पटेलने यंदाच्या IPL मध्येही दमदार कामगिरी केली आहे. स्लोअर वन चेंडू हे त्याच्या भात्यातील मुख्य अस्त्र आहे.
स्पिल्ट वेबिंगची दुखापत बरी व्हायला चार आठवड्यांचा अवधी लागतो. किती टाके पडले, त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हर्षल पटेलच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. रिकव्हरीसाठी त्याला NCA मध्ये यावं लागेल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं, तर हर्षल त्या सामन्यात खेळू शकणार नाही.
फक्त हर्षलचं नाही. पाच अन्य खेळाडू आजार आणि दुखापतीमधून सावरतायत. अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर हे खेळाडू सुद्धा दुखापतीचा सामना करतायत. पृथ्वी शॉ टायफाइडमधून सावरतोय.
“पृथ्वी शॉ च्या फ्रेंचायजीने त्याची कशा पद्धतीची फिटनेस टेस्ट केली, ते आम्हाला ठाऊक नाही. टीम इंडियाच्या फिटनेस टेस्टसाठी काही मार्गदर्शकतत्व आहेत. ती त्याने पूर्ण केली, तर तो पात्र ठरु शकतो” असं निवड समितीच्या सदस्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार आहे. भारतात ते पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळतील. त्यानंतर आयर्लंडचा दौरा आहे. जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.