सिडनी: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली सुरुवात केली आहे. त्यांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत. आधी पाकिस्तान आणि त्यानंतर नेदरलँडवर विजय मिळवला. पाकिस्तानवरील संघर्षपूर्ण विजयानंतर नेदरलँडवर टीम इंडियाने सहज मात केली. टीम इंडियाच्या विजयात सांघिक प्रयत्नांचा वाटा मोठा आहे. टीम इंडियासाठी सध्या सर्वकाही व्यवस्थित सुरु आहे. पण टीम इंडियासाठी एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे केएल राहुल.
रविवारचा सामना केएल राहुलसाठी महत्त्वाचा
टीम इंडियाचा उपकर्णधार आणि सलामीवीर केएल राहुलला या वर्ल्ड कपमध्ये अजून छाप उमटवता आलेली नाही. पाकिस्तान आणि हॉलंड दोन्ही मॅचमध्ये तो अपयशी ठरला. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा सामना केएल राहुलसाठी महत्त्वाचा आहे. या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा त्याच्यावर दबाव असेल.
टेक्निक परफेक्ट असते, पण मानसिक दबाव असतो
त्यामुळे राहुलने आता विराट कोहलीचा मार्ग अवलंबला आहे. विराट कोहली खराब फॉर्मचा सामना करत होता.त्यावेळी त्याने ‘मेंटल कंडिशनिंग’ कोच पॅडी अप्टन यांची मदत घेतली. खेळाडूंना मानसिक दृष्टया कणखर बनवण्यासाठी पॅडी अप्टन काम करतात. विराटने आपल्या खेळात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांची मदत घेतली होती. अनेकदा तुमच्या खेळात टेक्निक परफेक्ट असते. पण मानसिक दबाव असतो. त्याचा खेळाडूंवर परिणाम होतो. त्यामुळेच चांगली कामगिरी होत नाही.
विराट नंतर आता राहुलने या सेवेचा लाभ घेतलाय
आता टीम इंडियाकडे मानसिक कमकुवतपणावर मात करण्यासाठी पॅडी अप्टन यांची सेवा उपलब्ध आहे. विराट नंतर आता राहुलने या सेवेचा लाभ घेतलाय. प्रॅक्टिस मॅचमध्ये राहुलने चांगलं प्रदर्शन केलं होतं. पण आता मुख्य वर्ल्ड कपमध्ये त्याला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता येत नाहीय.