मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) उद्या राजकोट येथे चौथा टी 20 सामना होईल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सामना जिंकून मालिका खिशात घालायची आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या मॅचआधी टीम इंडियाला आणखी सावध व्हाव लागणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डि कॉक ( Quinton de Kock) चौथ्या सामन्यात खेळू शकतो. मागचे दोन सामने डि कॉक दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज एडन मार्करामला (Aiden Markram) कोविड-19 ची लागण झाली. त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतच खेळणार नाहीय. क्विंटन डि कॉक डावखुरा फलंदाज असून तो सलामीला येतो. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं. आयपीएलमध्ये डेब्यु करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाकडून तो खेळतो.
दक्षिण आफ्रिकन मीडिया रिपोर्ट्सच्या वृत्तानुसार, क्विंटन डि कॉक चौथ्या टी 20 सामन्यासाठी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. डि कॉक पहिला सामना खेळला. पण नंतरचे दोन सामने तो मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत हेनरिक क्लासनला संधी मिळाली. ज्याने मिळालेल्या चान्सचा अचूक लाभ उठवला.
आगामी इंग्लंड दौरा लक्षात घेता, क्विंटन डि कॉक संपूर्ण मालिकेतूनच माघार घेऊ शकतो, अशी चर्चा होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख ग्रॅमी स्मिथ यांनीच तसे संकेत दिले होते. “मी जे ऐकलय त्यानुसार दुखापत थोडी गंभीर आहे. पुढच्या सामन्यात खेळण्याचा तो धोका पत्करेल अस मला वाटत नाही. इंग्लंड दौरा लक्षात घेता दक्षिण आफ्रिका धोका पत्करणार नाही” असं स्मिथ स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाले होते.
आता दक्षिण आफ्रिकेच्या गोटातून आलेल्या वृत्तानुसार, क्विंटन डि कॉकमध्ये सुधारणा झाली असून तो चौथ्या टी 20 सामन्यात खेळू शकतो. सामना महत्त्वचा असल्याने क्विंटन डि कॉकच खेळणं दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचं आहे.