मुंबई: टीम इंडियामधून (Team india) आज एका 27 वर्षीय खेळाडूने डेब्यु केला. रांचीच्या मैदानात आज शाहबाज अहमदला (Shahbaj ahmed) डेब्युची संधी देण्यात आली आहे. याआधी त्याने टीम इंडियात प्रवेश केला होता. पण प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवता आलं नव्हतं. रांचीच्या (Ranchi) मैदानात टीम इंडियाला शाहबाज अहमदची गरज भासली.
देशातंर्गत क्रिकेटमध्ये शाहबाज बंगालच्या टीमच नेतृत्व करतो. तो चांगला ऑलराऊंडर आहे. डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि लेफ्टी बॅटिंग करतो. तो फिल्डिंगही उत्कृष्ट करतो.
टीम इंडियात निवड आधीच झाली होती, पण….
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच नाही, तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सुद्धा त्याची टीम इंडियात निवड झाली होती. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. वॉशिंग्टन सुंदरची रिप्लेसमेंट म्हणून तो झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय.
त्याने क्रिकेटची निवड केली
बंगालकडून क्रिकेट खेळणारा शाहबाज मूळात हरयाणाच्या मेवात जिल्ह्याचा निवासी आहे. शाहबाजच्या वडिलांना त्याला इंजिनियर बनवायचं होतं. त्यासाठी कॉलेजमध्ये त्याने प्रवेशही घेतला होता. 3 वर्ष इंजिनियरींगच शिक्षणही घेतलं. पण क्रिकेटची गोडी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर वडिलांनी क्रिकेट आणि अभ्यास यापैकी एकाची निवड करायला सांगितलं. शाहबाजने क्रिकेटची निवड केली.
7 मॅचेसमध्ये 6 सेंच्युरी
शाहबाज गुरगावच्या क्रिकेट अकादमीत सराव करायचा. आपला मित्र प्रमोद चंदीलाच्या सांगण्यावर तो बंगालला निघून गेला. तिथे जाऊन तपम मेमोरियल क्लबकडून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या क्लबकडून खेळताना त्याने पहिल्या 7 सामन्यातच 6 शतकं ठोकली. त्याशिवाय प्रभावी गोलंदाजी केली. लवकरच त्याच्या नावाची बंगालच्या क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली. त्याला फर्स्ट क्लासमध्ये संधी मिळाली.
स्थानिक क्रिकेटमध्ये कशी आहे कामगिरी?
बंगालसाठी लिस्ट ए च्या 27 सामन्यात शाहबाजने 47.28 च्या सरासरीने 662 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकं आहेत. गोलंदाजी करताना त्याने 24 विकेट घेतल्या आहेत. याच ऑलराऊंडर प्रदर्शनामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली.