मुंबई: टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World cup) ऑस्ट्रेलियात दाखल झालीय. तिथे त्यांनी तयारी सुरु केलीय. भारताचा दुसरा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) वनडे सीरीज (ODI Series) खेळतोय. या वनडे टीममध्ये काही खेळाडू असे आहेत, जे काही काळापूर्वी टी 20 टीमचा भाग होते. पण वर्ल्ड कपसाठी टीममध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. ती खंत या खेळाडूंच्या मनात आहे.
स्टार ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर अशा खेळाडूंपैकीच एक आहे. वर्ल्ड कप टीममध्ये स्थान न मिळाल्याने शार्दुल निराश आहे. पण अजूनही आपल्यात भरपूर क्रिकेट शिल्लक असल्याचं शार्दुलच म्हणणं आहे.
रिजेक्शनमुळे निराश
शार्दुल टीम इंडियासोबत रांचीमध्ये आहे. इथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 9 ऑक्टोबरला दुसरा वनडे सामना होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये शार्दुलने बॉल आणि बॅटने कमालीच प्रदर्शन केलं. प्रत्येकाप्रमाणेच माझं सुद्धा वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न होतं. “निश्चित हे निराशाजनक आहे. वर्ल्ड कपमध्ये खेळणं, चांगली कामगिरी करुन दाखवणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं” असं शार्दुल म्हणाला.
अजून बरचं क्रिकेट शिल्लक
मागच्यावर्षी यूएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. शार्दुल ठाकूर त्या टीमचा भाग होता. तिथे दोन मॅचमध्ये त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर तो टीम इंडियाच्या टी 20 टीममध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. आता शार्दुलची नजर आपल्या पुढच्या लक्ष्यावर आहे.
शार्दुल काय म्हणाला?
माझी निवड झाली नाही, ठीक आहे. पण माझ्यात अजूनही बरचं क्रिकेट शिल्लक आहे. पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप होणार आहे. मला ज्या सामन्यात संधी मिळेल, तिथे चांगलं प्रदर्शन करण्याचा, टीमच्या विजयात योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.
लोअर ऑर्डरमध्ये खेळण्याची इच्छा
शार्दुलने टीम इंडियाकडून खेळताना वनडे आणि टेस्ट मॅचेसमध्ये बॅटने योगदान दिलय. लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना उपयुक्त योगदान देण्याची त्याची इच्छा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये त्याने चांगलं प्रदर्शन केलं. संजू सॅमसनसोबत मिळून 66 चेंडूत 93 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केलं होतं. शार्दुलने वेगवान 33 धावा फटकावल्या. मात्र तरीही टीमचा पराभव झाला.