IND vs SA T20 Series: येत्या गुरुवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच T 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ याच आठवड्यात भारतात दाखल झाला आहे. भारताने या मालिकेसाठी आपल्या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा हे अव्वल खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. IPL 2022 मध्ये दर्जेदार खेळ दाखवणाऱ्या युवा खेळाडूंना मालिकेत संधी देण्यात आली आहे. भारताकडून अनेक युवा चेहरे या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. भारताने सलग 12 T 20 सामने जिंकेल आहेत. 13 वा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी भारताकडे आहे. भारताला वर्ल्ड रेकॉर्ड करण्यापासून रोखण्याचं आमच्यासमोर लक्ष्य आहे, असं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने म्हटलं आहे.
भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टीम इंडियाच्या दोन गोलंदाजांची धास्ती वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी दुकलीची भिती वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने तशी कबुलीच दिली आहे. टीम मीटिंगमध्येही दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज या दोघांचा कसा सामना करायचा, त्यावर चर्चा करतात असं बावुमाने सांगितलं.
“आम्ही याआधी कुलदीप आणि चहलच्या फिरकी गोलंदाजीचा सामना केला आहे. यावेळी आम्ही त्यांची गोलंदाजी समजून घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने खेळू अशी अपेक्षा आहे. आमचे खेळाडू व्यक्तीगत आणि टीम मीटिंगमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा करतात” असं बावुमा म्हणाला.
“सीनियर खेळाडूंचा अनुभव त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची संघातील तरुण खेळाडू कशी अमलबजावणी करतात, ते महत्त्वाच आहे. मागची दीड वर्ष आम्ही फिरकी गोलंदाजी ज्या पद्धतीने खेळलो आहोत, त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. यावेळी आम्ही फिरकी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवू” असं बावुमा म्हणाला.
नुकत्याच संपलेल्या आयपीएल सीजनमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी दमदार कामगिरीच प्रदर्शन केलं. आपल्या फिरकीच्या तालावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नाचवलं. चहलने 27 विकेट घेऊन पर्पल कॅप आपल्या नावावर केली, तर कुलदीपने 20 पेक्षा जास्त विकेट घेतले.