मुंबई: दक्षिण आफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियामध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून ही टी 20 मालिका सुरु होईल. टी 20 वर्ल्ड कपआधी तयारीच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा महत्त्वाच पाऊल आहे, असं कॅप्टन टेंबा बावुमा आणि कोच मार्क बाऊचर यांनी म्हटलं आहे.
या ट्रीपमागे उद्देश काय?
दक्षिण आफ्रिकन टीम आज भारतात दाखल झाली. पण भारतात येण्याआधी कॅप्टम बावुमा टीमला एका खास ठीकाणी घेऊन गेला होता. टीमला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने बावुमा संपूर्ण टीमला तिथे घेऊन गेला होता. बावुमा आणि कोच बाऊचर टीमला रॉबेन आइसलँड येथे घेऊन गेले होते. दिवंगत राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला याच बेटावरील तुरुंगात 18 वर्ष बंद होते.
या ठिकाणी टीम कधी गेली होती?
रॉबेन आइसलँडला भेट दिल्यामुळे भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकन टीमला प्रेरणा मिळेल, असा बावुमाला विश्वास आहे. मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकन टीम या बेटावर गेली होती. कॅप्टन बावुमासाठी ही स्पेशल ट्रीप होती. टेंबा बावुमा मूळचा केप टाऊनचा आहे. पण आता तो जोहान्सबर्गमध्ये राहतो.
मी 8 वर्षांचा असताना तिथे गेलो होतो
“रॉबेन आडसलँडला जाऊन आल्यामुळे टीममधील अनेकांना प्रेरणा मिळेल. याआधी मी 8 वर्षांचा असताना तिथे गेलो होतो. मला आता फार आठवत नाहीय. हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता” असं बावुमा मीडियाशी बोलताना म्हणाला.