मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजने टीम इंडिया नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध पहिला टी 20 सामना होणार आहे. आकडे आणि इतिहास पाहिला, तर भारताची बाजू वरचढ आहे. पण प्रत्येक दिवशी, प्रत्येक सामना नवीन असतो. टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्याला ही गोष्ट ठाऊक आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपलं अभियान सुरु करणार आहे. टीमला विजय मिळवून देण्यासाठी हार्दिकने आपला प्लान तयार ठेवला आहे.
हार्दिकने प्लेयर्सना दिला विश्वास
हार्दिकच्या प्लानचा उलटा परिणाम पहायला मिळू शकतो किंवा श्रीलंकेला याची किंमत सुद्धा चुकवावी लागेल. नव्या वर्षातील पहिल्याच सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा आणि विराट कोहली या आपल्या स्टार खेळाडूंशिवाय उतरणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हार्दिकने श्रीलंकेविरुद्ध काय रणनिती तयार केली असेल?. प्लेयर्सना मोकळीक हा हार्दिकच्या प्लानचा मुख्य भाग आहे. क्रीजवर उतरल्यानंतर खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने नॅचरल खेळ खेळण्याच हार्दिकने स्वातंत्र्य दिलय. तुम्ही पास किंवा फेल याचा विचार न करता बिनधास्त खेळा, असा विश्वास त्याने दिलाय.
आम्ही काही चुकीच करतोय, असं वाटत नाही
हार्दिकने काल पत्रकार परिषदेत आपल्या रणनितीची कल्पना दिली. “T20 वर्ल्ड कपच्या आधीपासून आम्ही काही चुकीच करतोय, असं मला वाटत नाही. आमचा अप्रोच, मानसिकता सगळं काही सारखच आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये आम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. आम्ही टीममधल्या प्रत्येक खेळाडूला, तुम्ही मैदानात जाऊन तुमचं बेस्ट द्या एवढच सांगितलय. त्यांना कसा सपोर्ट करायचा, ते आमच्यावर सोडून द्या” असं हार्दिक म्हणाला.
आत्मविश्वास वाढवणारे ते हार्दिकचे शब्द कुठले?
माझा टीममधल्या प्रत्येक खेळाडूला पूर्ण सपोर्ट आहे, असं हार्दिकने सांगितलं. देशातील बेस्ट क्रिकेटर असल्यामुळे तुम्ही इथे आहात, असं हार्दिक या खेळाडूंना म्हणाला. “खेळाडू दबावाखाली येणार नाहीत, हे मला पहायचय. जेणेकरुन ते मैदानावर बेस्ट देऊ शकतील. मी असं केलं, तर त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना कुठलीही अडचण येणार नाही” असं हार्दिक म्हणाला.