राजकोट: टीम इंडिया आणि श्रीलंकेत काल T20 सीरीजचा शेवटचा सामना झाला. दोन वर्षात सलग दुसरी T20 सीरीज आणि निकाल तोच. तीन T20 सीरीजच्या शेवटच्या सामन्यात काल भारताने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ही सीरीज 2-1 अशी जिंकली. नेहमीप्रमाणे टीम इंडियाने फक्त सीरीज जिंकली नाही, तर त्यांनी काही रेकॉर्डही आपल्या नावावर केले.
शनिवारी राजकोटमध्ये भारताने पहिली बॅटिंग केली. सूर्यकुमार यादवच्या 112 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 228 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव 137 धावात ढेपाळला. मॅचसोबत सीरीजही भारताने जिंकली. या सीरीजमधले काही खास रेकॉर्ड आणि आकडे जाणून घ्या.
– भारताने सलग पाचव्यांदा श्रीलंकेला आपल्या भूमीवर T20 सीरीजमध्ये हरवलय. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत भारतामध्ये 6 T20 सीरीज झाल्यात. 2009 साली खेळली गेलेली पहिली सीरीज 1-1 अशी बरोबरीत होती. म्हणजे श्रीलंकेची टीम अजूनपर्यंत भारताला भारतात हरवू शकलेली नाही.
– तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून श्रीलंकेची टीम भारतात आतापर्यंत 25 द्विपक्षीय सीरीज खेळली आहे. पण एकाही सीरीजमध्ये श्रीलंकेला विजय मिळवता आलेला नाही. भारत एकमेव देश आहे, जिथे श्रीलंकेला तिन्ही फॉर्मेटमध्ये अजूनपर्यंत यश मिळवता आलेलं नाही.
– टीम इंडियाने 2019 पासून मायदेशात एकही T20 सीरीज गमावलेली नाही. तोच रेकॉर्ड भारताने कायम ठेवला आहे. 2019 पासून भारतात टीम इंडियाने 12 सीरीज खेळल्यात. त्यात 10 मध्ये विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सीरीज ड्रॉ झाल्या.
– टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टी 20 मध्ये चौथ्यांदा एकाडावात 200 पेक्षा जास्त धावा केल्यात. याआधी टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 4 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्यात.
– मायदेशात टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. टीम इंडियाने मायदेशात 93 धावांनी मोठा विजय मिळवलाय. योगायोग म्हणजे 2017 साली श्रीलंकेविरुद्ध हा विजय मिळवला होता.
– सूर्यकुमार यादवने T20 मध्ये तिसर शतक फटकावलं. रोहित शर्माच्या नावावर T20 मध्ये चार शतकं आहेत. सूर्यकुमार T20 मध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय आहे.
– सूर्यकुमारने फक्त 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. रोहित शर्मानंतर भारतासाठी झळकवलेला हे दुसरं वेगवान शतक आहे. रोहितने 35 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.
– सूर्याने या इनिंगमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या. 843 चेंडूमध्ये सूर्याने ही करामत केली.