राजकोट: टीम इंडियाने काल श्रीलंकेविरुद्ध तिसरा टी 20 सामना जिंकला. या सामन्यासह टीम इंडियाने 2-1 अशी सीरीज जिंकली. टीम इंडियाच्या कालच्या विजयात सूर्यकुमार यादवच्या शतकाची मोठी भूमिका आहे. सूर्यकुमार यादवने काल तुफानी बॅटिंग केली. 45 चेंडूत त्याने शतक ठोकलं. पण सूर्याच्या सेंच्युरीआधी राहुल त्रिपाठीने पायाभरणी केली होती. बऱ्याच काळापासून राहुल त्रिपाठी हे नाव आयपीएलमध्ये चमकत होतं. श्रीलंकेविरुद्धच्या T20 सीरीजसाठी राहुल त्रिपाठीला टीम इंडियात संधी मिळाली.
त्याच्यासारख्या खेळाडूची का आवश्यकता आहे?
बऱ्याच संघर्षानंतर राहुल त्रिपाठीला टीम इंडियात संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात राहुल त्रिपाठी अपयशी ठरला. पण दुसऱ्या सामन्यात त्याने आपली क्षमता दाखवून दिली. टीम इंडियाला अप्रोच बदलण्यासाठी त्याच्यासारख्या खेळाडूची का आवश्यकता आहे? ते दाखवून दिलं.
त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही
श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात राहुल त्रिपाठीने 16 चेंडूत 35 धावा फटकावल्या. या इनिंगच्या बळावर सिलेक्टर्स आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला थेट संदेश दिलाय. यापुढे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राहुलची इनिंग छोटी असली, तरी प्रभावी होती. त्याने ज्या पद्धतीचे फटके मारले, त्यातून त्याचं टॅलेंट दिसून आलं.
राजकोटमध्ये तिसरा टी 20 सामना झाला. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेल्यानंतर तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला. राहुलने त्याच्या 35 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले.
बॉलरची लय बिघडवली
राहुलच्या या इनिंगच वैशिष्टय म्हणजे रिस्क घेऊन त्याने धावांचा वेग वाढवला. त्याची ती क्षमता दिसून आली. सुरुवातीच्या विकेट लवकर गेल्या. शुभमन गिलने तितकी आक्रमक सुरुवात केली नव्हती. राहुलने आक्रमक बॅटिंग केली. 2 सिक्स मारल्यानंतर राहुल थांबला नाही. तो अजून आक्रमक झाला. त्याने चौकार मारुन बॉलरची लय बिघडवली.
टीम इंडियात बदल हवा तो हाच
त्याच्या खेळीने कॅप्टन हार्दिक पंड्या आणि हेड कोच राहुल द्रविड नक्तीच खूश असतील. त्यांना टीम इंडियात ज्या बदलाची अपेक्षा होती, त्याची झलक त्यांना राहुलमध्ये दिसली. राहुल त्रिपाठीने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 मॅचमध्ये डेब्यु केला. पण तो फक्त 5 रन्स करुन आऊट झाला होता.