भारताने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली पहिला विजय मिळवला आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाची सुरुवात विजयाने झाली आहे. टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला 43 धावांनी पराभूत केलं. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. पण श्रीलंकेचा संपूर्ण संघ 170 धावांवर बाद झाला. पण एक स्थिती अशी होती की श्रीलंकेची सामन्यावर पकड निर्माण झाली होती. भारताने विजयासाठी दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. श्रीलंकेने 8.4 षटकात 1 गडी गमवून 84 धावा केल्या होत्या. 10 च्या रनरेटने श्रीलंकेची कूच सुरू झाली होती. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी श्रीलंकेने 14 षटकात 140 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे हा सामना हातातून निसटतो की काय असं वाटतं होतं. पण त्यानंतर सामन्याने कलाटणी मारली. अक्षर पटेलने पथुम निसंकाची विकेट घेतली आणि पडझड सुरु झाली. पुढच्या 30 धावात नऊ गडी तंबूत परतले. या सामन्यानंतर उपकर्णधार शुबमन गिलला आपलं मत व्यक्त केलं.
उपकर्णधार शुबमन गिलला या स्थितीबाबत विचारलं असता स्पष्ट सांगितलं की आमच्यावर कोणताच ताण नव्हता. “आम्ही त्या परिस्थितीत एकमेकांशी संवाद सुरु ठेवला होता. आम्हाला माहिती होतं की फक्त एका विकेटची गरज आहे.”, असं शुबमन गिल म्हणाला. यशस्वी जयस्वालसोबत फलंदाजीबाबत विचारलं असता म्हणाला की, त्याच्यासोबत फलंदाजी करण्याची वेगळीच मजा आहे. आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत असतो.आमची स्टाईल वेगळी आहे आणि आमची योजना साधी होती. परिस्थितीचा फायदा घेऊन गोलंदाजांवर प्रहार करतो. खेळपट्टीवर चेंडू कसा येतो याचा अंदाज घेत आम्ही फलंदाजी केली.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असालंका (क), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.