IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. 27 जुलैपासून श्रीलंका विरुद्ध भारत 3 T20 क्रिकेट सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा देखील झाली आहे. टीम इंडिया आता नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सल्ल्यानुसार खेळणार आहे. टी-20 विश्वचषक 2026 चं लक्षात ठेवून खेळाडूंची टी२० संघात निवड करण्यात आली आहे. संघात बहुतांश युवा खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित आणि विराट दोघे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी सलामी देत होते. आता श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात कोण सलामी देणार, असे प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.
श्रीलंका दौऱ्यात टी-२० क्रिकेट संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे असणार आहे तर एकदिवसीय संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावरही शुभमन गिलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 4-1 ने मालिका जिंकली होती. शुभमन गिलने या सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून चमकदार कामगिरी केली होती. शुभमनने 5 सामन्यात 170 धावा केल्या होत्या. त्यामुळे शुभमन गिलचे नाव आघाडीवर आहे.
यशस्वी जैस्वालने देखील आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीमुळेचे त्याला 2024 च्या T20 विश्वचषकाच्या संघात निवड झाली होती. पण यशस्वी जैस्वालला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकली नाही. तरी 2026 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या संघात यशस्वी जैस्वालला सलामीवीर फलंदाज म्हणून सेट केले जाऊ शकते.
संजू सॅमसन हा एक स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे. संजू सॅमसनही सलामीच्या फलंदाजाच्या स्थानाचा प्रमुख दावेदार आहे. सलामीवीर म्हणून गौतम गंभीरकडून संजू सॅमसनचीही परीक्षा होऊ शकते. संजू सॅमसनला टी-20 क्रिकेटमध्ये ज्या लयीत डावाची सुरुवात करायची आहे, ती योग्य वाटत आहे. संजूने झिम्बाब्वेविरुद्धही चमकदार कामगिरी केली आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नो, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
पहिला T20 सामना – 27 जुलै – पल्लेकेले क्रिकेट स्टेडियम
दुसरा T20 सामना – 28 जुलै – पल्लेकेले क्रिकेट स्टेडियम
तिसरा T20 सामना – 30 जुलै – पल्लेकेले क्रिकेट स्टेडियम