मुंबई: टीम इंडियाला (Team India) टी 20 वर्ल्ड कपआधी (T20 World cup) मोठा झटका बसला आहे. आज दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने (Western Australia) टीम इंडियावर 36 धावांनी विजय मिळवला. केएल राहुलने सर्वाधिक 74 धावा केल्या. पण पराभव टाळण्यासाठी या धावा पुरेशा नव्हत्या. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आजच्या सराव सामन्यात खेळले नाहीत. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 6 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 8 बाद 132 धावा केल्या.
टीम इंडियाच्या कुठल्या फलंदाजाने किती धावा केल्या?
ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल मोठी इनिंग खेळू शकले नाहीत. या सगळ्यांनीच निराशाजनक प्रदर्शन केलं. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. केएल राहुलने एकट्याने 74 धावा केल्या. पंत (9), दीपक हुड्डा (6) धावा करुन आऊट झाले. दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 10 धावा केल्या, अक्षर पटेलने 7 चेंडूत 2 रन्स केले. हार्दिक पंड्याने 9 चेंडूत 17 धावा केल्या.
हार्दिकने चांगली सुरुवात केली, पण…
169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाने धीमी सुरुवात केली. ऋषभ पंत पुन्हा एकदा सलामीला उतरला होता. पण तो अपयशी ठरला. पंत मोठा फटका खेळण्याच्या नादात 9 रन्सवर आऊट झाला. दीपक हुड्डाने 9 चेंडूत 6 धावा केल्या. हार्दिक पंड्याने मैदानावर येताच मोठे फटके मारले. त्याने 2 सिक्स मारले. तो व्यक्तीगत 17 धावांवर मॅकेंजीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मिडल ऑर्डर फ्लॉप
हार्दिक पंड्याची विकेट गेल्यानंतर टीम इंडियाची मिडल ऑर्डर कोसळली. ऑलराऊंडर अक्षर पटेलने 7 चेंडूत फक्त 2 धावा केल्या. दिनेश कार्तिक 10 धावा करण्यासाठी 14 चेंडू खेळला. हर्षल पटेलने 10 चेंडूत 2 धावा केल्या. अपवाद फक्त केएल राहुलचा. त्याने 55 चेंडूत 74 धावा फटकावल्या. त्याने मोठे फटके मारायला उशीर केला. राहुलने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
अश्विनची प्रभावी गोलंदाजी
प्रॅक्टिस मॅचमध्ये भले फलंदाज फ्लॉप ठरले. पण गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. खासकरुन अश्विनने. त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देऊन 3 विकेट काढल्या. त्याने आपल्या एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या. हर्षल पटेलने 27 धावा देऊन 2 विकेट काढल्या. अर्शदीप सिंहने एक विकेट काढली.