IND vs WI: कायरन पोलार्डने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं, त्याच्यामुळे दोन खेळाडू दुखापतग्रस्त

| Updated on: Feb 17, 2022 | 2:41 PM

या सामन्यात भारताला अनुकूल असं सर्व घडलं. पण तरीही दोन घटनांमुळे टीम इंडियाचं (Indian Cricket Team) टेन्शन थोडं वाढलं आहे.

IND vs WI: कायरन पोलार्डने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं, त्याच्यामुळे दोन खेळाडू दुखापतग्रस्त
कायरन पोलार्डमुळे भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त
Follow us on

कोलकाता: भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये (India vs West Indies T20i) दमदार सुरुवात केली आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर काल टी 20 मालिकेतील पहिला सामना झाला. टी 20 च्या पहिल्या लढतीत भारताने वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला. वनडे प्रमाणे भारताने टी 20 सीरीजची चांगली सुरुवात केली आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजचा हा सलग चौथा पराभव आहे. या सामन्यात भारताला अनुकूल असं सर्व घडलं. पण तरीही दोन घटनांमुळे टीम इंडियाचं (Indian Cricket Team) टेन्शन थोडं वाढलं आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डने (Kieron Pollard) टेन्शन देण्याचं काम केलं. त्याच्या दोन शक्तीशाली फटक्यांमुळे टीम इंडियाचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त असून ते पुढच्या सामन्यांना मुकू शकतात.

पोलार्डने 24 धावांची खेळी केली, पण….
कायरन पोलार्डमुळे वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि वेंकटेश अय्यर दोघे दुखापतग्रस्त झाले आहेत. पोलार्ड या सामन्यात मोठी खेळी खेळला नाही. त्याने फक्त 24 धावा केल्या. पण त्याच्या या छोटया खेळीने टीम इंडियाला टेन्शन दिलं आहे. वेस्ट इंडिजच्या डावाच्या शेवटी पोलार्डने दोन असे फटके खेळले, ते रोखताना दीपक चाहर आणि वेंकटेश अय्यरला दुखापत झाली. 17 व्या षटकात पोलार्डने लाँग ऑनच्या दिशेने एक मोठा फटका खेळला. तिथे वेंकटेश अय्यर उभा होता. चेंडू इतका वेगात आला की, वेंकटेशच्या हातातून निसटून थेट सीमारेषेपार गेला. चेंडूचा वेग इतका होता की, वेंकटेशच्या बोटांना मार बसला. तो दुखापतीने विव्हळत होता.

दीपक चाहरला सोडावं लागल मैदान
वेंकटेश नंतर 19 व्या षटकात वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतग्रस्त झाला. 19 व्या षटकात भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर पोलार्डने जोरदार फटका मारला. स्क्वेयर लेगवर उभ्या असलेल्या दीपक चाहरने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला. चेंडू चाहरच्या हाताला लागून सीमारेषेपार गेला नाही. पण डाव्या हाताला चेंडू जोरात लागला. त्यामुळे दीपक चाहर मैदानात विव्हळत होता. त्याला मैदान सोडाव लागलं. त्याने आपला कोटा पूर्ण केला नाही. फक्त तीन षटक गोलंदाजी केली.

स्कॅनिंग नंतरच पुढे समजेल
दुखापत झाल्यानंतर वेंकटेश फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने 13 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तबही केलं. दोघांच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयकडून कुठलही अपडेट आलेलं नाही. दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीचं स्कॅन केलं जाईल. त्यानंतरच सीरीजमध्ये ते पुढे खेळणार की नाही ते स्पष्ट होईल. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. उद्या 18 फेब्रुवारीला दुसरा सामना होणार आहे.

ind vs wi 1st t20 venkatesh iyer and deepak chahar injury scare kieron pollard