मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. पहिल्या मॅच मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज वर सहज विजय मिळवला होता. हेड कोच राहुल द्रविड यांचा, आजचा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आहे. पण काही बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. खासकरुन श्रेयस अय्यरचा फॉर्म. श्रेयस अय्यरने वनडे मध्ये जबरदस्त कामगिरी केलीय. पण टी 20 मध्ये तो संघर्ष करतोय. टीम मॅनेजमेंटला काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हेड कोच राहुल द्रविड यांनी पहिल्या टी 20 सामन्यात श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवला. पण त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. श्रेयस अय्यर 4 चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने डाव सावरला.
श्रेयस अय्यर फक्त चांगल्या सुरुवातीलाच मोठ्या खेळीत बदलण्यात अपयशी ठरत नाहीय, तर त्याच्या धावांमध्येही घट होत आहे. श्रीलंकेविरुद्ध टी 20 सीरीज मध्ये तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. तिन्ही इनिंग्समध्ये अय्यरने 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. 174 च्या स्ट्राइक रेटने त्याने 204 धावा केल्या होत्या. आता श्रेयस 130 च्या स्ट्राइक रेटने धावा करतोय.
दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनच्या रुपाने भारताकडे पर्याय उपलब्ध आहेत. दोघेही टी 20 मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हुड्डा संघाचा भाग आहे. दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरच्या जागी दीपक हुड्डाला जास्त पसंती मिळू शकते. मागच्या चार इनिंग्स मध्ये हुड्डाने टी 20 क्रिकेट मध्ये 204 धावा केल्या. यात आयर्लंड विरुद्ध एक शतक आहे. हुड्डा प्रसंगी फिरकी गोलंदाजी सुद्धा करु शकतो. आता राहुल द्रविड श्रेयस अय्यरला वगळून त्याच्याजागी दीपक हुड्डाला संधी देतात का? ते पहावं लागेल.