अहमदाबाद: गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांनी अचूक फायदा उचलत वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 44 धावांनी पराभव केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने (prasidh krishna) भेदक गोलंदाजी केली. त्याने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून ब्रँडन किंग (18), डॅरने ब्रावो (1) आणि निकोलस पूरने (9) या आघाडीच्या फलंदाजांसह एकूण चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने मागच्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या जेसन होल्डरला अवघ्या (2) धावांवर दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. चांगली फलंदाजी करणाऱ्या अकील हुसैनला (34) धावांवर शार्दुल ठाकूरने बाद केले. त्याने दोन विकेट घेतल्या. सिराज, चहल आणि दीपक हुड्डाने प्रत्येकी एक विकेट घेतला.