मुंबई: टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची (IND vs ODI) तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) आधीच जिंकली आहे. सध्या भारताकडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे. तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे. आता खरा प्रश्न आहे की, मालिका जिंकल्यामुळे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) तिसऱ्या वनडेसाठी संघात काही बदल करतील का?. राहुल द्रविड यांचं आतापर्यंतच धोरण बघितलं, तर त्यांनी पराभवानंतर संघात लगेच बदल केलेले नाहीत. निकाल काहीही लागो, खेळाडूंवर विश्वास दाखवून त्यांनी तोच संघ कायम ठेवला आहे. पण आता भारताने मालिका जिंकली आहे, अशा स्थिती मध्ये अन्य खेळाडूंना संधी देऊन पहायला हरकत नाही. तिसऱ्या वनडेत काही खेळाडूंना ते संधी देतील, अशी अपेक्षा आहे. ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह आणि इशान किशन यांना अजून चालू मालिकेत संधी मिळालेली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्यांनी पराभूत झालेल्या संघामध्ये आत्मविश्वास निर्माण केला व त्यांच्याकडून विजयी कामगिरी करुन घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने पहिले दोन सामने गमावले होते. पण त्यानंतरही द्रविड यांनी संघ बदलला नाही. तोच संघ कायम ठेवला. याच संघाने पुढचे दोन सामने जिंकून आफ्रिकेला धक्का दिला. शेवटचा टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे मालिकेचा निकाल लागू शकला नाही. आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेकडे बेंच स्ट्रेंथची चाचणी म्हणून पाहिलं जातय. कारण या सीरीज मध्ये अनेक सीनियर खेळाडूंना विश्रांती दिलीय.
शार्दुल ठाकूर सोडल्यास पहिल्या दोन वनडेत अन्य खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय. शार्दुल गोलंदाजीत महागडा ठरला असला, तरी त्याने नियमित विकेट काढल्या आहेत. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी सुद्धा मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. दुसऱ्यावनडेतून डेब्यु करणाऱ्या आवेश खानला चमकदार कामगिरी करता आली नाही. पण द्रविड यांचं व्हिजन लक्षात घेता, तो तिसऱ्या वनडे सामन्यात खेळेल.
मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याजागी अर्शदीप सिंहचा समावेश होऊ शकतो. शार्दुल ठाकूर, अर्शदीप आणि आवेश खान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसलेलं त्रिकुट गोलंदाजीत कशी कामगिरी करते, त्याची सुद्धा चाचपणी करता येईल. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांना संधी मिळणं अवघड दिसतय. कारण शुभमन गिलला त्यासाठी बसवावं लागेल. दोन्ही वनडेत शुभमन गिलने सरस प्रदर्शन केलय. मुळात म्हणजे तो सुद्धा टीम इंडियाच्या बेंच स्ट्रेंथचा भाग आहे.