मुंबई: तब्बल 6 महिन्यानंतर भारतीय संघात (Team India) पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरने (Deepak chahar) जबरदस्त कमबॅक केलं आहे. काल झिम्बाब्वे विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात त्याने सुरुवातीचे तीन विकेट काढले. त्याच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज ढेपाळले. पावरप्लेच्या षटकात विकेट काढून देणं, ही त्याची खासियत आहे. आयपीएल आणि त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये दीपक चाहरला दुखापतीमुळे खेळता आलं नाही. पण त्याची गुणवत्ता आणि कौशल्य लक्षात घेता, आगामी आशिया कप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) स्पर्धेसाठी तो टीमच्या योजनेचा भाग आहे. फक्त त्याचा फिटनेस कळीचा मुद्दा आहे. त्यावर बीसीसीआयची निवड समिती लक्ष ठेवून आहे. काल सहा महिन्यांनी पहिला वनडे सामना खेळताना दीपक चाहरच्या बाबतीत फिटनेसची कुठली समस्या जाणवली नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटला.
पुढच्या आठवड्यापासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी दीपक चाहरचा संघात समावेश करणार का? हा आता मुख्य प्रश्न आहे. ‘आम्ही दीपक चाहरवर लक्ष ठेवून आहोत’, असं निवड समिती सदस्याने इनसाइडस्पोर्ट्ला सांगितलं.
“तो दुखापतीनंतर संघात पुनरागमन करतोय, त्यामुळे तुम्ही त्याची थेट आशिया कप स्पर्धेसाठी संघात निवड करु शकत नाही. स्पर्धेआधी खेळाडू बदलण्याचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. जर त्याने चांगली कामगिरी केली, त्याला सूर गवसला, त्याला संधी देण्याचा विचार करु” असं निवड समिती सदस्याने सांगितलं.
दुखापत होण्याआधी जशी कामगिरी करत होतो, त्याच स्तराची कामगिरी करण्यासाठी मेहनत केल्याचं दीपक चाहरने सांगितलं. टी 20 वर्ल्ड कपचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत का? या प्रश्नावर चाहर म्हणाला की, “माझी निवड होईल किंवा नाही, हे मी सांगू शकत नाही. ते माझ्या हातात नाही. पण कौशल्यआधारित मी भरपूर मेहनत केलीय”