U-19 World Cup 2022 साठी टीम इंडियाची घोषणा, 17 यंगस्टर्स भारताला पाचव्यांदा चॅम्पियन बनवणार

| Updated on: Dec 19, 2021 | 9:17 PM

अंडर-19 वर्ल्डकप 2022 साठी (19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने यश धुलच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.

U-19 World Cup 2022 साठी टीम इंडियाची घोषणा, 17 यंगस्टर्स भारताला पाचव्यांदा चॅम्पियन बनवणार
U-19 World Cup Indian Team 2018 (File Photo)
Follow us on

मुंबई : अंडर-19 वर्ल्डकप 2022 साठी (19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने यश धुलच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. चार वेळा चॅम्पियन बनलेला भारत पाचव्या विजेतेपदासाठी दावा करणार आहे. 14 जानेवारीपासून वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2020 मध्ये प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती, मात्र अंतिम सामन्यात भारताला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. (India Announce 17-Member Squad For 2022 Under-19 World Cup; Yash Dhull will lead)

बीसीसीआयने रविवारी 19 डिसेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. संघाची कमान दिल्लीच्या यश धुलच्या हाती आहे. त्याच्याआधी विराट कोहली आणि दिल्लीचा उन्मुक्त चंद यांनीही अंडर-19 विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले आहे. अशा परिस्थितीत धुललाही तोच वारसा पुढे चालवायला आवडेल. धुलसह संपूर्ण भारतीय संघ सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव शिबिरात सहभागी होत आहे. विश्वचषकापूर्वी संघ यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घेणार आहे.

U-19 World Cup 2022 साठी भारताचा संघ

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे. एसके रशीद संघाचा उपकर्णधार असेल.

यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगकृष रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर. एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.

स्टँडबाय खेळाडू – ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंग राठोड

भारतीय संघ ब गटात

16 संघांच्या या स्पर्धेत चार गट असून भारताला ब गटात ठेवण्यात आले आहे. भारताशिवाय या गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीगच्या टप्प्यात पोहोचतील आणि विजेतेपदासाठी दावा करतील. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. संघाचा दुसरा सामना 19 जानेवारीला आयर्लंडशी आणि शेवटचा ग्रुप सामना 22 जानेवारीला युगांडासोबत आहे.

पाचव्या विजेतेपदासाठी भारतीय संघ सज्ज

भारत हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. 1988 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्यांदा यश मिळाले. यानंतर 2008 मध्ये विराट कोहली, 2012 मध्ये उन्मुक्त चंद आणि 2018 मध्ये पृथ्वी शॉने विजेतेपद मिळवून दिले. भारतीय संघ 2016 आणि 2020 मध्ये उपविजेता ठरला होता. आता पाचव्या विजेतेपदासाठी भारताला जोरदार प्रयत्न करावे लागतील.

इतर बातम्या

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 4: ऑस्ट्रेलियासमोर हतबल इंग्लंड पराभवाच्या छायेत

Ind vs SA: केएल राहुल उपकर्णधार झाल्याने मुंबईकर अजिंक्य रहाणेचं संघातील स्थान धोक्यात? 26 डिसेंबरला काय होणार?

ना ‘नो बॉल’, ना ‘डेड बॉल’, फलंदाज क्लीन बोल्ड होऊनही Not out, कसं काय? पाहा VIDEO

(India Announce 17-Member Squad For 2022 Under-19 World Cup; Yash Dhull will lead)