कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर रोमहर्षक विजय मिळवला. संघातील वरच्या फळीतील प्रमुख खेळाडू बाद झालेले असताना देखील दीपक चाहरने (Deepak Chahar) शेवटपर्यंत खिंड लढवून भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर (India vs Sri Lanka) तीन विकेट्सने मात करत तीन सामन्यांची मालिका 2-0 ने घातली. विशेष म्हणजे या विजयासोबत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.
भारताने मंगळवारच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत श्रीलंकेवर एकदिवसीय सामन्यात 93 वा विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटमधील एकाच संघाविरोधात एखाद्या संघाने मिळवलेल्या विजयांची ही सर्वाधिक संख्या होती. या विजयासोबतच भारताने ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 92 वेळा विजयाचा रेकॉर्ड तोडला आहे.
श्रीलंका संघाविरोधात त्यांच्याच भूमित हा भारताचा सलग दहावा विजय होता. 2012 पासून भारत श्रीलंकेविरोधात एकही एकदिवसीय सामना पराभूत झालेला नाही. तसेच भारताचा श्रीलंकेविरोधात हा सलग 9 वा मालिका विजय होता. भारताने 1997 पासून श्रीलंकेविरोधात एकही एकदिवसीय सामन्यांची मालिका पराभूत झालेला नाही. तिन्ही फॉर्मेटचा विचार करता श्रीलंकेविरोधात मागील 20 सीरीजमधील एकही सिरीज भारत पराभूत झालेला नाही.
श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची आज खराब सुरुवात झाली. आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) एका मागोमाग एक ठराविक अंतराने बाद होत गेले. परंतु सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने 35 धावांचं योगदान दिलं. कृणाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र दीपक चाहरने हाती घेतली. सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली.
हे ही वाचा :
IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग
दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?
(India beat Sri Lanka in 2nd Odi and sets record of most wins against single team with 93 wins)