हॅमिल्टन: दुसऱ्या वनडेसाठी आज निवडलेल्या प्लेइंग 11 वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पावसामुळे सामना रद्द झाला. पण टीमच्या निवडीवर अनेकांनी आक्षेप नोंदवले आहेत. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला बाहेर बसवण्यात आलं. संजूने पहिल्या ऑकलंड वनडेमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या वनडेसाठी त्याला बाहेर बसवण्याची गरज नव्हती, असं अनेकांच मत आहे.
टि्वटरवर संताप
कॅप्टन शिखर धवनने प्लेइंग 11 जाहीर केल्यानंतर संजूच्या फॅन्सनी टि्वटरवर आपला संताप व्यक्त केला. धवन आणि हेड कोच व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी संजूला बाहेर बसवून त्याच्याजागी दीपक हुड्डाचा समावेश केला. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून का वगळलं? ते कारण शिखर धवनने सांगितलं.
श्रेयससोबत 96 धावांची भागीदारी
संपूर्ण टी 20 सीरीजमध्येही संजू बेंचवर बसून होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्याने हे दुर्देवी असल्याच म्हटलं होतं. रणनीतिक कारणांमुळे संजूला बाहेर बसवल्याचं हार्दिकने सांगितलं होतं. ऑकलंड वनडेसाठी संजूला संधी दिली. त्याने 38 चेंडूत 36 धावा केल्या. श्रेयस अय्यरसोबत 96 धावांची भागीदारी केली.
म्हणून सॅमसनला ड्रॉप केलं
चांगली कामगिरी करुन संजू सॅमसनला टीममधून का ड्रॉप केलं? त्याच उत्तर शिखर धवनने दिलं आहे. “आम्हाला टीममध्ये सहावा गोलंदाज हवा होता. म्हणून संजूला बसवून हुड्डाला संधी दिली. दीपक चाहर चेंडू स्विंग करु शकतो, म्हणून त्याची निवड केली. आमचे काही खेळाडू बाहेर आहेत, पण हा संघ सुद्धा मजबूत आहे” असं शिखर धवन म्हणाला.
ऋषभला का संधी?
तिसऱ्या वनडेसाठी सुद्धा हीच रणनिती असेल, तर संजूला त्या मॅचमध्येही संधी मिळणार नाही. खरंतर ऋषभ पंतचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. पण तो टीमचा उपकर्णधार असल्यामुळे त्याला वारंवार संधी मिळतेय.