मुंबई: आशिया कप 2022 स्पर्धा गोलंदाजांसाठी चांगली ठरलेली नाही. टुर्नामेंट सुरु होण्याआधीच टीम इंडियासह अन्य टीम्सचे गोलंदाज बाहेर गेले. दुखापत हे त्यामागे कारण आहे. स्पर्धेच्या मध्यावरच रवींद्र जाडेजाला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं. आता भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. युवा वेगवान गोलंदाज आवेश खान स्पर्धेबाहेर गेला आहे. फिटनेसमुळे तो खेळू शकणार नाहीय. आवेश खानच्या जागी दीपक चाहरचा स्क्वाडमध्ये समावेश करण्यात आलाय. पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात आवेश खान टीमचा भाग होता.
पीटीआयच्या वृत्तानुसार आजारपणामुळे आवेश खान स्पर्धेबाहेर गेला आहे. पाकिस्तान विरुद्ध सुपर 4 सामन्याआधी आवेश खानला ताप आला होता. आवेश खानला लवकर बरं वाटेल, अशी हेड कोच राहुल द्रविड यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. आज श्रीलंकेविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये आवेश खानला संघात स्थान मिळालं नाही. त्याचवेळी त्याची तब्येत बरी नसल्याचा अंदाज बांधला गेला. कदाचित टुर्नामेंट मध्ये तो पुढे खेळणार नाही.
टुर्नामेंट सुरु होण्याआधी हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्याजागी सिलेक्टर्सनी भुवनेश्वर, अर्शदीपच्या जोडीला आवेश खानचा संघात समावेश केला. आवेश ग्रुप राऊंडमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्ध खेळला. पण आपल्या कामगिरीने तो प्रभावित करु शकला नाही. हाँगकाँग सारख्या अनुभवहीन संघाविरुद्ध त्याने 4 ओव्हर्समध्ये 53 धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याला ताप आला. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध पुढचा सामना तो खेळू शकला नाही.