वेलिंग्टन: टीम इंडियाच येत्या शुक्रवारपासून नवीन मिशन सुरु होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील पराभव मागे सोडून टीम इंडिया न्यूझीलंडला भिडणार आहे. दोन्ही टीम्समध्ये टी 20 चा पहिला सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियासाठी ही सीरीज सोपी नाहीय. न्यूझीलंडमध्ये ही मालिका होत आहे. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याच टीम इंडियासमोर मोठं आव्हान असेल.
तिघांना विश्रांती
या सीरीजमध्ये हार्दिक पंड्यासमोर मुख्य प्रश्न सलामीच्या जोडीचा आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तिघांना विश्रांती देण्यात आली आहे. वनडे आणि टी 20 मध्ये रोहित शर्मा-केएल राहुलची जोडी सलामीला येते.
शुभमन गिलसोबत ओपनिंगला कोण?
आता अनेक युवा खेळाडू टीममध्ये आहेत. हार्दिकसमोर वेगवेगळे पर्याय आहेत. शुभमन गिल सलामीला येतो. त्याच्यासोबत कोणाला पाठवायचा हा मुख्य प्रश्न आहे. इशान किशनने टीम इंडियासाठी सलामीवीरीची भूमिका बजावली आहे. पण अनेक सामन्यांमध्ये तो चाचपडताना सुद्धा दिसलाय. या सीरीजमध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो.
वर्ल्ड कपमध्ये इथेच चूक झाली
टी 20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग टीम इंडियाची मुख्य समस्या होती. एकाही सामन्यात राहुल आणि रोहितला खणखणीत सलामी देता आली नाही. सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यातही ही जोडी ढेपाळली. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. T20 क्रिकेटमध्ये वेगवान आणि दमदार सुरुवात मिळणं गरजेच असतं. हीच बाब लक्षात घेऊन हार्दिक आणि कोच व्ही.व्ही. एस लक्ष्मण निर्णय घेतील.
सूर्यकुमार ओपनिंगला येणार?
सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा आणि संजू सॅमसन या सर्वांनी टीम इंडियासाठी टी 20 मध्ये ओपनरची भूमिका बजावली आहे. चौथ्या क्रमाकांवर सूर्यकुमार सध्या परफेक्ट आहे. धावगती वाढवण्यात त्याचा रोल महत्त्वाचा असतो. चांगल्या सुरुवातीसाठी सूर्यकुमारला पुन्हा एकदा सलामीला संधी मिळू शकते.