नवी दिल्ली: भारताच्या टीमने आज अफगाणिस्तानचा चार विकेट आणि 10 चेंडू राखून पराभव केला व अंडर-19 आशिया कपच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी 260 धावांचे टार्गेट दिले होते. राजा बावा आणि कौशल तांबेने सातव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी करुन भारताला विजय मिळवून दिला.
बावाने 55 चेंडूत नाबाद 43 धावा तडकावत सामना जिंकून दिला. सलामीवीर हरनूर सिंहने 74 चेंडूत 65 धावांची खेळी केली. रघुवंशी आणि त्याने 104 धावांची सलामी दिली. कर्णधार यश धुलने 26 आणि निशांत सिंधूने 19 धावा केल्या. बावा आणि तांबेने विजय मिळवून दिला. या विजयामुळे ग्रुपमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी सगळे सामने जिंकले आहेत. 197 धावांवर भारताच्या सहा विकेट गेल्या होत्या. संघ अडचणीत होता. त्यावेळी बावा (४३) आणि तांबेने (३५) नाबाद राहत विजय मिळवून दिला. बांगलादेश आणि श्रीलंकेमधील विजेत्याशी भारताचा उपांत्यफेरीत सामना होणार आहे.