मुंबई: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी भारतीय संघाच अत्यंत व्यस्त वेळापत्रक आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड मध्ये टी 20 मालिका खेळतोय. त्यानंतर वनडे सीरीज (Odi Series) आहे. इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होईल. त्यानंतर श्रीलंकेत आशिया कप स्पर्धा आहे. एकूणच पुढच्या तीन महिन्यातला भारतीय संघाचा कार्यक्रम अत्यंत व्यस्त आहे. त्यातही भारतीय संघ पुढच्या महिन्यात झिम्बाब्वे विरुद्ध (zimbabwe Tour) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यासाठी अधिकृतपणे तारखांची घोषणा होणं, अजून बाकी आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, हे सामने आयसीसीच्या एकदिवसीय सुपर लीगचा हिस्सा असतील. 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हे सामने खेळले जातील.
झिम्बाब्वे विरुद्धची ही मालिका महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण याचे पॉइंटस पुढच्यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या क्वालिफिकेशनसाठी विचारात घेतले जातील. “भारतीय संघ इथे खेळायला येणार, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. एक संस्मरणीय मालिका होईल, अशी अपेक्षा आहे” असं झिम्बाब्वे क्रिकेटच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
“आमच्या खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे. त्यांना टीम इंडियाच्या दिग्गज आणि मोठ्या खेळाडूंविरोधात खेळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे देशातील युवा खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी अधिकाधिक प्रेरणा मिळेल, आमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे” असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
भारतीय संघ सहावर्षानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी 2016 साली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता, त्यावेळी तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका झाली होती. यावेळी भारतीय संघ फक्त वनडे सीरीज खेळणार आहे.