मुंबई: आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होतेय. आशियातील टॉप संघांमध्ये सामने होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कप मध्ये उतरणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारा आशियाचा प्रत्येक संघ या स्पर्धेत उतरणार आहे. अनेक देशांनी आपले संघ निवडले आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडे 8 ऑगस्टपर्यंत अंतिम संघाची यादी पाठवायची आहे. भारत 8 ऑगस्टला आशिया कपसाठी आपली टीम निवडणार आहे. त्याचं काऊंटडाऊन सुरु झालय.
आशिया कपसाठी टीम इंडियात कुठल्या-कुठल्या खेळाडूंना संधी मिळू शकते? लवकरच याबद्दलच चित्र स्पष्ट होईल. आशिया कपसाठी भारतीय संघात दोन खेळाडूंच पुनरागमन निश्चित मानलं जात आहे. दीपक चाहर आणि केएल राहुल आशिया कपसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात स्थान मिळवू शकतात, Insidesport.in ने PTI च्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होते.
आशिया कप मध्ये खेळणारा संघ टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कप संघ असेल, असं मानलं जातय. म्हणजे आशिया कप मधून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपच चित्र स्पष्ट होईल.
आशिया कप स्पर्धेच्या नियमानुसार, प्रत्येक संघाला आपल्या 15 खेळाडूंची यादी आशिया क्रिकेट काऊन्सिलकडे सोपवायची आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सिलेक्शन कमिटी आशिया कपसाठी 17 सदस्यीय संघ निवडू शकते.
आशिया कपच आयोजन 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी केएल राहुल आणि दीपक चाहरची संघात निवड होऊ शकते. केएल राहुलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड होणार होती. पण कोरोना आणि हर्नियाच्या ऑपरेशमुळे त्याची निवड होऊ शकली नाही.
केएल राहुलने टीम इंडियात पुनरागमन केल्यास, तो ओपनिंग करताना दिसू शकतो. मागच्या 6 T20I सामन्यात ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी रोहित शर्मासह ओपनिंग केली आहे.