मुंबई: ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (T 20 world cup) होणार आहे. या स्पर्धेसाठी संघ जाहीर व्हायला, आता महिन्याभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. वर्ल्ड कपसाठी 80 ते 90 टक्के संघ तयार असल्याचा विश्वास कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) व्यक्त केला. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल आगामी आशिया कप 2022 स्पर्धेला मुकणार आहेत. “टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला अडीच महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्याआधी आशिया कप (Asia Cup) त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. त्यामुळे 80 ते 90 टक्के टीम तयार आहे. निश्चितच तीन ते चार बदल होऊ शकतात. हे सगळं परिस्थितीवर अवलंबून आहे” रोहित शर्माने म्हटलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडूला उसळी मिळते, त्यामुळे संघाता वेगवान गोलंदाजांचा भरणा असेल. मोहम्मद शमीचा संघात समावेश होऊ शकतो. निवड समितीने टी 20 साठी युवा खेळाडूंना प्राधान्य देण्याचं धोरण ठरवलं होतं. पण जसप्रीत बुमराहच्या फिटनेस बद्दल साशंकता असल्याने त्याच्याजागी अनुभवाची कमतरता जाणवेल. म्हणून मोहम्मद शमीचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
“आतापर्यंत, आम्ही भारतात खेळलोय. आता यूएई मध्ये खेळणार आहोत. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती वेगळी असेल. ऑस्ट्रेलियात आपल्या संघाला काय मानवतं, ते पहाव लागेल” असं रोहित शर्मा म्हणाला. टी 20 वर्ल्ड कप आधी रोहित शर्माचा संघ आशिया कप मध्ये पाकिस्तानच्या आव्हानाला कसा सामोरा जातो, त्याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. आशिया कप मध्ये भारत-पाकिस्तान सामना 28 ऑगस्टला रंगणार आहे. त्यानंतर सुपर 4 आणि फायनल मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर होऊ शकते. मागच्यावर्षी वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने पराभव केला होता. भारतीय संघाने त्या पराभवाचा बदला घ्यावा, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आजपासून भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कप टी 20 स्पर्धा सुरु होत आहे.