मुंबई: T20 World CUP साठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणारी टी 20 सीरीज त्याच तयारीचा भाग आहे. हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी मागचे काही महिने टी 20 टीममध्ये सातत्याने प्रयोग केले. त्यातून वर्ल्ड कपसाठी टीम निवडली आहे. कागदावर टीम इंडिया बळकट वाटतेय.
तो एक वेकअप कॉल
फलंदाजी, गोलंदाजी आणि ऑलराऊंडर्समुळे टीम संतुलित दिसतेय. पण नुकत्याच संपलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या कमकुवत बाजू उघड झाल्या. आशिया कप टीम इंडियासाठी एक वेकअप कॉल होता. आपण कशात कमी पडतोय, ते यातून दिसून आला. याच पार्श्वभूमीवर हेड कोच राहुल द्रविड यांनी बीसीसीआयकडे एक खास विनंती केली आहे.
द्रविड यांनी काय विनंती केली?
यंदा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार आहे. तिथल्या वातावरणात रुळण्यासाठी, तयारीसाठी टीमला लवकर ऑस्ट्रेलियात पाठवण्याची विनंती द्रविड यांनी बीसीसीआयला केली आहे. टीम इंडियासाठी जास्तीत जास्त सराव सामने आयोजित करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. जेणेकरुन खेळाडूंना ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा अंदाज येईल.
कधी रवाना होणार टीम इंडिया?
याआधी टीम इंडिया 9 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होती. पण द्रविड यांच्या विनंतीनंतर टीम इंडिया आता 5 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, टीम इंडिया आता आणखी 2 ते 3 सराव सामने ऑस्ट्रेलियात खेळणार आहे.
कोणाबरोबर बोलणी सुरु?
“आयसीसीने काही वॉर्म-अप मॅचेस आयोजित केल्या आहेत. त्याशिवाय आणखी सराव सामने खेळण्यासाठी आमची काही टीम्स बरोबर बोलणी सुरु आहेत. द्रविड आणि सपोर्ट स्टाफसह संपूर्ण टी 20 वर्ल्ड कप टीम 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल” असं बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी 20 सामना कधी?
नेट बॉलर्स आणि स्टँडबाय खेळाडूंसह टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, असं वृत्त इनसाइड स्पोर्ट्ने दिलं आहे. इंदूर येथे 4 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी 20 सामना होणार आहे, त्यानंतर टीम इंडिया लगेच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल.