एडिलेड: टीम इंडियाच T20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलय. काल सेमीफायनल मॅचमध्ये इंग्लंडने भारताचा 10 विकेट राखून दारुण पराभव केला. या पराजयाने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींच मन मोडलं आहे. ते उदास, निराश आहेत. मैदानावरील खेळाडूंच्या खराब कामगिरीबरोबर टीम सिलेक्शन अशी टीम इंडियाच्या पराभवाला बरीच कारणं आहेत. बीसीसीआयकडून लवकरच या सगळ्या मुद्यांचा आढावा घेऊन टी 20 क्रिकेटसाठी नव्याने संघ बांधणी होईल.
कोण होईल कॅप्टन?
पुढचा टी 20 वर्ल्ड कप आणखी दोन वर्षांनी 2024 मध्ये होणार आहे. त्या दृष्टीने बीसीसीआय कठोर निर्णय घेण्यासाठी तयार आहे. सर्वातआधी टी 20 च्या कॅप्टनशिपबद्दल निर्णय घेतला जाईल. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याची पूर्णवेळ कॅप्टन म्हणून नियुक्ती होऊ शकते. पुढच्या महिन्यात हा निर्णय झाला नाही, नजीक भविष्यात याबद्दल निर्णय होईल. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
दोन दुखापतींमुळे प्लान गडबडला
“निश्चितच, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आम्ही आधीपासून तयारी केली होती. टीमला लवकर पाठवलं होतं. दोन दुखापतींमुळे प्लान गडबडला. पण हा खेळाचा भाग आहे. तुम्ही इंग्लंडच्या टीमकडे बघितलं, तर ते सुद्धा जोफ्रा आर्चर आणि मार्क वुडशिवाय खेळले. पण त्यांनी टीम इंडियासारखा संघर्ष केला नाही. कॅप्टनशिपबद्दल बोलायच झाल्यास, त्यावर चर्चा होईल. न्यूझीलंड सीरीजनंतर आम्ही यावर चर्चा करु” असं वरिष्ठ बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितलं.
रोहित शर्मा का नको?
टी 20 मध्ये टीम इंडियाला चांगलं यश मिळवून देणाऱ्या कॅप्टनने बलिदान का द्यायच? त्याच उत्तर आहे ‘वय’. रोहित शर्मा आता 35 वर्षांचा आहे. पुढच्या 2024 वर्ल्ड कपच्यावेळी त्याचं वय 37 असेल. वनडे आणि टेस्टमध्ये त्याला नेतृत्व करायचं आहे. त्याला सतत विश्रांती दिली जाते. 2024 चा वर्ल्ड कप लक्षात घेऊन, टीम इंडिया वेगळ्या कॅप्टनचा पर्याय निवडू शकते.