मुंबई: टीम इंडियाचा काल T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये दारुण पराभव झाला. इंग्लंडने भारतावर तब्बल 10 विकेट राखून विजय मिळवला. इतक्या वाईट पराभवाची भारतीय क्रिकेटप्रेमींनी अजिबात अपेक्षा केली नव्हती. या पराभवाचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कॅप्टनशिपपासून सिलेक्शन कमिटीला या सेमीफायनल पराभवाची किंमत चुकवावी लागणार आहे.
काय बदल होणार?
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना पदावरुन पायउतार व्हायला सांगितलं जाऊ शकतं. आता दोन वर्षांनी 2024 मध्ये होणारा टी 20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआयने तयारी सुरु केलीय. बीसीसीआयकडून नवीन क्रिकेट सल्लागार समिती स्थापना होईल.
त्यावेळी चेतन शर्मा यांच्या कामावर कुऱ्हाड कोसळेल. संपूर्ण सिलेक्शन कमिटीमध्ये बदल होऊ शकतात. यात T20 क्रिकेटचा अनुभव असलेला कमीत कमी एका सिलेक्टर निवड समितीवर येईल.
त्यांना सुद्धा उत्तर द्याव लागेल
“काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. काहींना दुखापत झाली. संपूर्णपणे निवड समितीला जबाबदार धरता येऊ शकत नाही. पण ते सुद्धा सिस्टिमचा भाग आहेत. त्यांना सुद्धा उत्तर द्याव लागेल. नवीन क्रिकेट सल्लागार समिती अस्तित्वात आल्यानंतर काही बदल होतील” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.