मुंबई: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (India England Tour) रवाना झाला आहे. येत्या 1 जुलैपासून भारत आणि इंग्लंडमध्ये मालिकेतील पाचवा अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे मालिकेतील एक कसोटी सामना बाकी राहिला होता. तो कसोटी सा्मना आता जुलै मध्ये खेळला जाईल. या कसोटी सामन्यासाठी केएल राहुलच्या जागी मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) निवड होऊ शकते, अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती. कारण केएल राहुल दुखापतीमुळे या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय. बीसीसीआयला केएल राहुलच्या जागी मयंक अग्रवालची निवड करायची होती. पण शुभमन गिल (Shubhaman Gill) इंग्लंडमध्ये आहे. सलामीवीर म्हणूनच त्याची निवड केली आहे. त्यामुळे शुभमन गिल असताना, तूर्तास मयंक अग्रवालची गरज नाहीय, असं संघ व्यवस्थापनाचं मत आहे. दरम्यान आज टीम इंडियाचा दुसरा ग्रुप बंगळुरुहून इंग्लंडला रवाना झाला. यामध्ये हेड कोच राहुल द्रविड, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.
भारतीय संघातील काही खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश आहे. कसोटी सामन्याआधी भारतीय संघ लिसेस्टशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. 24 जून पासून ही मॅच सुरु होईल.
मयंक अग्रवालला स्टँडबायवर ठेवण्यात येईल. टीम मॅनेजमेंटच्या मते सध्या त्याची गरज नाहीय. कोणाला दुखापत झाली, तर मात्र त्याचा संघात समावेश करण्यात येईल, असं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने इनसाइट स्पोर्टला सांगितलं.
मयंक अग्रवालला कसोटी सामन्याच्या दृष्टीने तयारी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. अलीकडेच तो कर्नाटककडून रणजीच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये खेळला होता. “मयंक बंगळुरुमध्ये सराव सुरु ठेवेल. कोणाला दुखापत झाली, तर त्याला इंग्लंडला पाठवण्यात येईल. सध्या तो संघासोबत जाणार नाही. एकापेक्षा जास्त कसोटी सामने असते, तर मयंकला पाठवलं असतं” असं अधिकाऱ्याने सांगितलं. कालच भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्द पाच टी 20 सामन्यांची मालिका संपली. पावसामुळे अखेरचा सामना रद्द झाला. त्यामुळे सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली