मुंबई: टीम इंडियाने नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं. त्यामुळे सीरीज आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. तिसऱ्या सामन्याला आता फायनलच स्वरुप प्राप्त झालय. रविवारी हैदराबादमध्ये हा सामना खेळला जाईल. या मॅचमधील विजयी टीम सीरीज जिंकेल. त्यामुळे दोन्ही टीम्स राजीव गांधी स्टेडियममध्ये सर्वस्व पणाला लावून खेळतील.
दोघांच्या फॉर्मची चिंता
टीम इंडियाला आपल्या गोलंदाजांची विशेष करुन हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलच्या फॉर्मची चिंता आहे. टी 20 वर्ल्ड कपआधी दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये यावेत, अशीच टीम इंडियाची इच्छा असेल.
लास्ट ओव्हर्समध्ये मार खातोय
जसप्रीत बुमराहने चांगलं कमबॅक केलय. दुसरा सीनियर गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. भुवनेश्वर आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात फ्लॉप ठरला. दुसऱ्या सामन्यात त्याला बाहेर बसवण्यात आलं. खासकरुन लास्ट ओव्हर्समध्ये भुवनेश्वर मार खातोय.
हर्षल पटेलचा दिशा आणि टप्पा हरवला
हर्षल पटेलने दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन केलय. पण तो फॉर्ममध्ये दिसत नाहीय. त्याला अजून गोलंदाजी करताना लय सापडलेली नाही. वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी हर्षल पटेल ओळखला जातो. पण त्याने या सीरीजच्या सहा मॅचेसमध्ये 81 धावा दिल्या आहेत. तो सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय. हर्षलला दिशा आणि टप्पा सापडलेला नाही. त्याला अजूनपर्यंत एकही विकेट मिळालेला नाही.
अक्षरने केली कमाल
अक्षर पटेलने गोलंदाजीत कमाल केली आहे. त्याने दोन्ही सामन्यात टिच्चूक मारा केला व विकेट्स काढल्या. युजवेंद्र चहल एकाबाजूला मार खातोय. पण अक्षर पटेल सरस ठरतोय.
कोहली-राहुलच्या कामगिरीत सातत्य नाहीय
केएल राहुल आणि विराट कोहलीच्या कामगिरीत सातत्य नाहीय. त्यांना सतत धावा कराव्या लागतील. सूर्यकुमार यादवही मागच्या काही सामन्यात अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. पण हार्दिक पंड्या चांगली कामगिरी करतोय.
लेग स्पिर्न्स विरोधात संघर्ष
लेग स्पिन भारतीय फलंदाजांची कमजोरी आहे. लेग स्पिर्न्स विरोधात भारतीय फलंदाज संघर्ष करतायत. ऑस्ट्रेलियाच्या झम्पाने काल त्याचाच फायदा उचलला. टीम इंडियात दिनेश कार्तिक फिनिशरच्या रोलमध्ये आहे. पुढेही त्याला आणखी संधी मिळतील.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.